बापलेकांना आॅनलाइन गंडा
By admin | Published: July 5, 2017 03:35 AM2017-07-05T03:35:29+5:302017-07-05T03:35:29+5:30
बँक खात्यांची माहिती घेऊन एटीएम कार्डाच्या माहितीवरून वडील आणि मुलाच्या खात्यामधून आॅनलाइन खरेदी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बँक खात्यांची माहिती घेऊन एटीएम कार्डाच्या माहितीवरून वडील आणि मुलाच्या खात्यामधून आॅनलाइन खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी संजय बेंद्रे (वय ५६, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. बेंद्रे हे खासगी लेखापरीक्षक म्हणून काम करतात. अज्ञात आरोपीने बेंद्रे यांच्या मोबाईलवर फोन केला. बँकेचे एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगत हे कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी मोबाईलवर आलेला मेसेज फॉरवर्ड करण्यास सांगितले. बेंद्रे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागितला; मात्र बेंद्रे यांनी त्यांना कोणताही क्रमांक कळविला नाही. तरीही आरोपीने खात्याच्या माहितीचा वापर करून त्यांचे वडील श्रीधर गणेश बेंद्रे यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावरून १४ हजार ५५९ रुपयांची खरेदी करून फसवणूक केली. हा प्रकार ११ आॅक्टोबर २०१६ रोजी घडला होता.
थ्रीडी सिक्युअर पिन तयार करून खरेदी
४ मे २०१७ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास बेंद्रे यांच्या मोबाईलवर पुन्हा एका व्यक्तीने फोन करून, त्यांना आयआरटीसीची तक्रार लॉगिन होत नसल्याचे सांगत डेबिट कार्डचा क्रमांक मागितला; मात्र बेंद्रे यांनी कार्ड क्रमांक व ओटीपी क्रमांक देण्यास नकार दिला.
आरोपीने त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावरून सुरुवातीला ५० रुपये आणि नंतर २० हजार
रुपये काढण्याचा प्रयत्न
केला; परंतु, आरोपीला हे पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे त्याने थ्रीडी सिक्युर पिन
तयार करून त्यांच्या खात्यामधून ९ हजार ९९९ रुपयांची खरेदी केली.
पुढील तपास उपनिरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.