विजेचा शॉक लागून बापलेकाचा मृत्यू; जुन्नर तालुक्याच्या बोरी खुर्द मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 17:26 IST2021-07-25T17:26:17+5:302021-07-25T17:26:24+5:30
शेतामध्ये गेली तीन ते चार वर्षापासून बंद पडलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा होत्या. वादळामुळे खांब पडल्यामुळे या तारा शेतामध्ये तशाच पडून होत्या. तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू नव्हता. परंतु अचानकपणे विद्युत प्रवाह सुरु झाल्याने फवारणी करणाऱ्या दोघांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला.

विजेचा शॉक लागून बापलेकाचा मृत्यू; जुन्नर तालुक्याच्या बोरी खुर्द मधील घटना
वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द येथे कमलजामातानगरमध्ये शेतामध्ये ऊसाला औषध फवारणी करत असताना रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास विजेचा शॉक लागून वडील व मुलाचा मृत्यू झाला.
यादव भिमाजी पटाडे (वय ७०वर्ष) व त्यांचा मुलगा श्रीकांत यादव पटाडे( वय३७ वर्ष) हे दोघेजण उसाच्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करत होते. त्यांच्या शेतामध्ये गेली तीन ते चार वर्षापासून बंद पडलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा होत्या. वादळामुळे खांब पडल्यामुळे या तारा शेतामध्ये तशाच पडून होत्या. तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू नव्हता. परंतु अचानकपणे विद्युत प्रवाह सुरु झाल्याने फवारणी करणाऱ्या दोघांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला.
मृत्यूस महावितरण जबाबदार
शेतामध्ये काम करत असताना विजेचा शॉक लागून पिता - पुत्राच्या मृत्यूस महावितरण जबाबदार असल्याचा आरोप बोरी खुर्द ग्रामस्थांनी केला आहे. गेली तीन ते चार वर्षापासून बंद असणारी विद्युत पुरवठा करणारी विद्युत वाहिनी बंद होती. तिच्या तारा तशाच खाली पडून होत्या अनेक वेळा ग्रामस्थांनी तक्रारी करूनही या तारा महावितरणने हटवल्या नाहीत. वेळीच या तारा महावितरणने काढल्या असत्या तर ही दुर्घटना टळली असती.
अनेक ठिकाणी धोकादायक तारा
महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या अनेक तारा या धोकादायक आहेत. अनेक ठिकाणी खांब वाकलेले असून ताराही धोकादायक पदतीने लोंबकळलेल्या आहेत. याबाबत महावितरणने दुरुस्ती करणे गरजेचे आहे.