मनसेला पावला नाही बाप्पा

By admin | Published: September 23, 2015 03:20 AM2015-09-23T03:20:42+5:302015-09-23T03:20:42+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शहराध्यक्ष मिळत नसल्याने पक्षाचे इंजिन नेतृत्वाविनाच अडखळत धावत आहे. इच्छुक शहराध्यक्ष झाल्याच्या थाटात शहरात मिरवत आहेत.

Bappa does not have MNS footfall | मनसेला पावला नाही बाप्पा

मनसेला पावला नाही बाप्पा

Next

मिलिंद कांबळे, पिंपरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शहराध्यक्ष मिळत नसल्याने पक्षाचे इंजिन नेतृत्वाविनाच अडखळत धावत आहे. इच्छुक शहराध्यक्ष झाल्याच्या थाटात शहरात मिरवत आहेत. त्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. या कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काहीजण इतर राजकीय पक्षांच्या मार्गावर आहेत.
शहराध्यक्ष मनोज साळुंखे यांचा कार्यकाल संपून, अनेक वर्षेे लोटली आहेत. नवा शहराध्यक्ष निवडीसाठी मुलाखतीचा फार्स तीन ते चार वेळा झाला. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यभराचा दौरा आटोपून सर्वांत शेवटी राज ठाकरे शहरात आले होते.
चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये बंद दाराआड त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहराध्यक्षपदाची चाचपणी केली. काही कारणामुळे हा कार्यक्रम अर्ध्यावर टाकत ते निघून गेले होते. त्यांनी शहराध्यक्ष नेमण्याचे वचन दिले. तुमच्यातील एकाचे नाव एकमताने
ठरविण्यास सांगितले होते. इच्छुक
असलेल्या चार-पाच जणांची मुंबईत ठाकरेंनी स्वत: मुलाखत घेतली. आता कोणत्याही स्थितीत शहराध्यक्ष मिळेल, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, अनेक महिने वाट पाहूनही निवडीची प्रक्रिया अपूर्णच राहिली.
सतत मागणी करूनही नेतृत्वाची निवड होत नसल्याने कार्यकर्ते नाराजी पसरली आहे. त्यात राज ठाकरे पुणे शहरात वारंवार येऊन जातात. मात्र, शेजारच्या पिंपरी-चिंचवड शहराकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यांना भेटण्यासाठी थेट मुंबई गाठावी लागते. तेथेही ते भेट देतील, याची शक्यता कमीच आहे. पक्षनेतृत्वाची उदासीनता, त्यात कार्यकर्त्यांमध्ये नसलेला ताळमेळ प्रकर्षाने दिसून येतो. याच स्थितीत मनसेचे भरकटलेले इंजिन शहरात धावत आहे.
महापालिकेची निवडणूक दीड वर्षावर येऊन ठेपली आहे. आता गणेशोत्सवही संपत आला आहे. तरीही शहराध्यक्षाची निवड होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. अखेर कार्यकर्ते गणरायाकडे प्रार्थना करीत आहेत की, शहराध्यक्ष निवडीची बुद्धी नेतेमंडळींना दे.

Web Title: Bappa does not have MNS footfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.