बेभानांना अद्दल घडवण्याची बुद्धी दे बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:16+5:302021-09-10T04:17:16+5:30

पुण्यातूनच ‘ती’चा गणपती ही चळवळ सुरू करण्यामागे ‘लोकमत’ची भूमिका आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ ...

Bappa, give me the wisdom to make the ignorant unconscious | बेभानांना अद्दल घडवण्याची बुद्धी दे बाप्पा

बेभानांना अद्दल घडवण्याची बुद्धी दे बाप्पा

googlenewsNext

पुण्यातूनच ‘ती’चा गणपती ही चळवळ सुरू करण्यामागे ‘लोकमत’ची भूमिका आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ पुण्यातच सुरू केली. सावित्रीबाईंच्या निर्धाराचे शिक्षणाच्या प्रकाशाचे अग्निपंख महिलांना लाभले. त्यातून या तेजस्विनी आणखी उजाळून निघाल्या. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात केली. अर्धे जग असलेल्या महिलांच्या हाती आरतीचे ताट देण्याची सुरुवातही ‘ती’चा गणपतीने पुण्यात सुरू केली. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ देणारी ‘ती’चा गणपती ही एक चळवळ म्हणून पुढे येत आहे. ‘ती’चा गणपती हे केवळ वैचारिक अधिष्ठान राहू नये यासाठी कृतिशील पाऊलही उचलले. गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सव काळात महिला सुरक्षेचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने ‘मिडनाईट बाईक रॅली’ काढण्यात येत आहे. भर मध्यरात्री दुचाकीवरून या रॅलीत सहभागी होत आत्तापर्यंत हजारो महिलांनी सुरक्षेचा जागर केला आहे. मात्र, समाजात विकृत नजरा आहेत तोपर्यंत महिला सुरक्षेच्या चळवळीला पूर्णविराम देताच येत नाही. पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे ही चळवळ आणखी गतिमान करण्याची गरज प्रतीत झाली आहे. संकल्पसिध्दी ही यंदाच्या ‘ती’चा गणपतीची संकल्पना आहे. समाजातील सर्व स्तरांवर जागर होत महिला सुरक्षेची संकल्पसिध्दी व्हावी हीच शक्ती ‘ती’चा गणपतीकडून मिळावी. स्त्रीकडे सन्मानाने पाहिले पाहिजे, तिला बरोबरीने वागवले पाहिजे ते ‘स्त्री दाक्षिण्य’ म्हणून नव्हे तर तो तिचा हक्क आहे म्हणून. स्त्री ही गुलाम नाही, भोग्य वस्तू नाही ती या जगातल्या कुठल्याही पुरुषाइतकीच सामर्थ्यवान, बुद्धीवंत, प्रतिभाशाली आणि कर्तुत्ववान आहे. याची जाणीव तीला झाली आहे. होते आहे. गरज आहे ती पुरुषी मानसिकता बदलण्याची. याच संकल्पाची सिद्धी होण्याची बुद्धी गणरायाने समस्त पुणेकरांना, समस्त महाराष्ट्राला आणि भारताला द्यावी. पुढचे दहा दिवस गणरायाच्या आगमनाने आनंदाचे, उत्साहाचे असतीलच. त्याला जोड देऊया समाजभानाची. रिद्धी-सिद्धीविना गणरायासुद्धा अपूर्ण आहे, हे समजून घेऊयात. घरातल्या, दारातल्या, समाजातल्या प्रत्येक कन्येचा, बहिणीचा, मातेचा, पत्नीचा सन्मान जपूयात. बेमूवर्तखोर, बेभान, निर्ढावलेल्यांना अद्दल घडवण्याची बुद्धीही समाजात उदंड वाढीस लागू दे बाप्पा.

Web Title: Bappa, give me the wisdom to make the ignorant unconscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.