बाप्पा मोरया! पुण्यात खबरदारी घेत गणरायाचं आगमन होणार; मंडळांच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सकाळपासून सुरु...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 01:06 PM2021-09-09T13:06:05+5:302021-09-09T13:30:47+5:30
प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी यंदाही निर्बंध असल्याने अनेक मंडळांनी भाविकांसाठी २४ तास ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे
पुणे : दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात अन् गणरायाच्या जयघोषात वैभवशाली गणेशोत्सव साजरा केला जातो. पण कोरोनाच्या सावटाखाली यंदाही सर्व नियम आणि खबरदारी घेऊनच लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. शहरातील मानाच्या गणपतीबरोबरच प्रमुख सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सकाळपासूनच होणार आहे.
यंदा मंडळाच्या बैठकीत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यास एकमत झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी निर्बंध असल्याने अनेक मंडळांनी भाविकांसाठी २४ तास ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, गणेशोत्सवाची ओळख असणारे सांस्कृतिक कार्यक्रमही फेसबुक व युट्यूबवरून प्रक्षेपित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती
श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११. ३८ वाजता खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा फेसबुक लाईव्हद्वारे घरूनच बघावा अशी विनंती मंडळाच्या वतिने करण्यात आली आहे. तसेच रोज सायंकाळी ८ वाजता श्रींच्या आरतीचा लाभ भाविकांना फेसबुक लाईव्हद्वारे घेता येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली आहे. ऑनलाइन दर्शन @Shrikasbaganpati/Facebook या लिंकचा वापर करावा असं सांगण्यात आले आहे.
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सालाबादप्रमाणे येणारा व पुण्यनगरीचे वैशिष्ट्य असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा १० ते १९ सप्टेंबर या काळात साजरा होणार आहे. तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११. ३० वाजता सनई चौघडांच्या कर्णमधूर साथीत वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी. (विश्वस्त व प्रमुख आचार्य वेदभवन पुणे) यांच्या हस्ते होणार आहे. कोरोनाचे सावट अजूनही कायम असल्यामुळे हा उत्सव साधेपणाने करण्याचे आपण सर्वांनी ठरवले आहे. त्यामुळे सर्व नागरिक. हितचिंतक, आणि सभासदांना @Shree Tambadi Jogeshwari Ganeshotsav Mandal/YouTube या लिंकद्वारे सोहळ्यात सहभागी होता येईल. अशी माहिती अध्यक्ष प्रशांत टिकार यांनी दिली आहे.
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम
गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १ वाजता श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचे वर्षी मंडळाच्या उत्सव मुर्तीचे ५० वे वर्ष आहे. दररोज सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीं ची आरती, गणेश याग, मंत्रजागर, सत्यनारायण महापूजा असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहे. @गुरुजी तालीम मंडळ/Facebook या ऑनलाईन लिंकद्वारे गणेश भक्तांना श्रीं चे दर्शन घेता येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली आहे.
मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी दुपारी १२.३० वाजता बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते होणार आहे. गणपती मंदिरात प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिराभोवती आकर्षक घंटी महालाची सजावट सरपाले बंधूंनी साकारली आहे. ''@मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट/Facebook'' या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच गणेशोत्सवात यू ट्यूबवर शिल्पकारांचा गणपती या मालिकेतून तुळशीबाग मंडळात जडणघडण झालेल्या कलाकारांच्या मुलाखतीतून त्यांचे अनुभव व त्या काळी साकारलेले देखावे यांची माहिती मिळणार आहे. तसेच गणेश याग, बृहनस्पती याग, मंत्रजागर, असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहे अशी माहिती कोषाध्यक्ष नितीन पंडीत यांनी दिली आहे.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती मंडळ
केसरीवाडा गणपती मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी १० वाजता रोहित टिळक यांच्या हस्ते होणार आहे. गणपतीच्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ @KESARINEWSPAPER/YouTube या लिंकद्वारे भाविकांना घेता येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. गीताली टिळक यांनी दिली आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षानिमित्त सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री व वेदमूर्ती मिलींद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा मंदिरामध्ये संपन्न होईल. गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक आरास करण्यात येणार आहे. श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाचा १२८ वा गणेशोत्सव मागील वर्षाप्रमाणे यंदाही साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा गजानन विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीला दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. ऑनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग,सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे. मंडळाच्या https://akhilmandaimandal.org/ या वेबसाईट वरुन शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे.
श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ
श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होणार आहे. दररोज सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीं ची आरती, गणेश याग, मंत्रजागर, सत्यनारायण महापूजा असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहे. http://www.bhaurangari.com या ऑनलाईन लिंकद्वारे गणेश भक्तांना श्रीं चे दर्शन घेता येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे यांनी दिली आहे.