अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 02:21 PM2023-06-21T14:21:49+5:302023-06-21T14:38:16+5:30

यंदाच्या गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ गणपती उभारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती

Bappa of Dagdusheth will sit in the grand replica of Prabhu Shri Ram Mandir in Ayodhya | अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा'

अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा'

googlenewsNext

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे १३१ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, यापार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा व पूजन कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या हस्ते झाले. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांच्या उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा श्रीराम मंदिराची प्रतिकृती केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील श्री गणेश व प्रभू श्रीराम भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे.
 
मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरुन त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस असणार आहेत. 

मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.
 
सजावट विभागात १०० कारागिर दिवस-रात्र सलग ७५ दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबून देखील सहजतेने श्रीं चे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Bappa of Dagdusheth will sit in the grand replica of Prabhu Shri Ram Mandir in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.