विसर्जन मिरवणुकीत ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे बाप्पा मयूररथात होणार विराजमान
By श्रीकिशन काळे | Published: September 27, 2023 08:30 PM2023-09-27T20:30:11+5:302023-09-27T20:30:50+5:30
मानाच्या गणपतीनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार ...
पुणे : गणरायाचे उद्या वाजतगाजत विसर्जन करण्यात येणार असून, अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणूकीसाठी खास रथ तयार केले आहेत. यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पासाठी आकर्षक असा मयूररथ तयार करण्यात आला आहे. त्यामधून बाप्पाची गुरूवारी सायंकाळी ७ वाजता विसर्जन मिरवणूक निघेल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाची धामधूम शहरामध्ये पहायला मिळत आहे. आज उत्सवाचा नववा दिवस असून उद्या गुरुवारी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘ यंदाही बाप्पाची जल्लोषात आणि शानदार अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने मयूरपंख रथ सजविला आहे. रथासमोर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा पथके जोरदार वादन होईल. या पथकांमध्ये समर्थ पथक, रमणबाग पथक, श्रीराम पथक या तीन पथकांचा समावेश आहे. त्यासोबतच रथासमोर पारंपरिक मर्दानी खेळांचेही प्रात्यक्षिक जगभरातील गणेश भक्तांना आणि पुणेकरांना पहायला मिळेल.’’
‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक सर्वांसाठी प्रमुख आकर्षण असते. पुण्याबाहेरील अनेक गणेश भक्त मिरवणूक पहायला येतात. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.
- पुनीत बालन, विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट