'बाप्पाचा' उत्सव यंदा होणार साधेपणाने साजरा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणेशोत्सव मंडळाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 04:00 PM2020-05-21T16:00:20+5:302020-05-21T16:25:56+5:30
शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल.
पुणे : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय, बुधवारी झालेल्या मानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ कॉन्फसरींग मिटींग मध्ये घेण्यात आला.
यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने पूजा अर्चा, गणेश याग, मंत्र जागर, अथर्वशिर्ष, आरती असे सर्व धार्मिकविधी पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.
बैठकीला कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, प्रसाद कुलकर्णी, गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविणशेठ परदेशी, राजू परदेशी, श्री पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी उपस्थित होते.
...................................
*गणरायाला मास्क नको
या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूतीर्कारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल. असे करू नये. अशी सूचना मंडळांना देण्यात आली.
............
दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रोषणाईला फाटा
दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची भव्यदिव्य रोषणाई असते़ ही सजावट करण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो़ परंतु, अजून लॉकडाऊन सुरू आहे़ तो अजून वाढेल की नाही हे आता सांगता येत नाही़ कदाचित पाचवा लॉकडाऊनसुद्धा असू शकेल़ आमची दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस सजावटीची तयारी सुरु होते़ त्यामुळे या वेळी मोठी सजावट, रोषणाई नसेल, अत्यंत साधेपणाने व डामडौल न करता परंपरा पाळण्यासाठी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.तसेच गणरायासमोर ऋषिपंचमीला सुमारे २५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले जाते़ मात्र, कोरोनाचे संकट लक्षात घेता व आताची परिस्थिती पाहून केवळ काही महिलांच्या हस्ते प्रतीकात्मक अथर्वशीर्ष पठण घेण्याचा विचार सुरु आहे़ त्या वेळी महिलांची काय भूमिका असेल, यावर किती महिलांना बोलवायचे हे ठरविण्यात येईल़ अशोक गोडसे, अध्यक्ष,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट