भेगडेंच्या प्रचारात बळजबरी घुसून कार्यकर्त्यांना बाजूला केले; शेळकेंवर आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 03:31 PM2024-11-11T15:31:25+5:302024-11-11T15:32:42+5:30
भेगडे यांची प्रचारसभा सुरू होणार असल्याचे माहित असूनही जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुनील शेळके आणि त्यांच्यासोबत १५ जण घुसले
लोणावळा : मावळमधील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बळजबरीने घुसून, त्यांना बाजूला करून पोलिसांच्या सूचना न मानता भांगरवाडी राम मंदिरात जाणाऱ्या आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या १० ते १५ कार्यकर्त्यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात शांतता आणि आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार शेळकेंवर आठवड्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार सुनील शेळके (रा. तळेगाव दाभाडे), प्रदीप कोकरे, मंगेश मावकर, धनंजय काळोखे (सर्व रा. लोणावळा) व इतर १० ते १५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार शेखर भास्कर कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लोणावळ्यातील राम मंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके ताफ्यासह आले. नियोजित दौऱ्यानुसार ते सकाळी ११ वाजता तेथे असलेल्या लोहगड उद्यान येथे अपेक्षित होते आणि घटना घडली त्यावेळी म्हणजे सायंकाळी पाच वाजता ते जुना खंडाळा या परिसरात असणे अपेक्षित होते. मात्र, ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेला आदेश न पाळता सायंकाळी पाच वाजता लोहगड उद्यान येथे आले. तेथे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची प्रचारसभा सुरू होणार असल्याचे आमदार शेळके यांना माहीत होते. या प्रचार सभेसाठी भेगडे यांनी रीतसर परवानगी घेतली होती. शिवाय राम मंदिरात जाण्याचे आमदार शेळके यांच्या दौऱ्यामध्ये नियोजित नसतानाही पोलिसांच्या सूचना न मानता ते अपक्ष उमेदवार भेगडे यांच्या प्रचारासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून राम मंदिरात गेले.
आमदार शेळके व त्यांच्यासोबत असलेले प्रदीप कोकरे, मंगेश मावकर, धनंजय काळोखे व इतर १० ते १५ कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केला. भेगडे यांच्या प्रचारासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी, शर्तीचा व शांततेचा भंग केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.