बारामतीत पासपोर्ट सेवा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 04:07 AM2018-05-20T04:07:31+5:302018-05-20T04:07:31+5:30
दर ५० किलोमीटरवर सुविधा : परराष्ट्र मंत्रालयाचे उद्दिष्ट
पुणे : राज्यात बारामती आणि माढा यासह अमरावती, अकोला, चंद्र्रपूर येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. तसेच, महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे त्या संदर्भात ट्विटरद्वारे माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने देशात दर ५० किलोमीटर अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र्र उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ हा कार्यक्रम पोस्ट विभागाच्या मदतीने सुरू केला आहे. पासपोर्ट तुमच्या दारी या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.
या टप्प्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या ठिकाणांसह पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्यांच्या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रासह देशात १४ राज्यांमध्ये ३८ नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
‘पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पहिल्या दोन टप्प्यांत महाराष्ट्रात आतापर्यंत वर्धा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्र परिक्षेत्रातील सिल्वासा व दमण-दीव या ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रे उघडण्यात आली आहेत. या कार्यक्रमांतर्गत १३ सेवा केंद्र्रे सुरू झाली असून उर्वरित ७ पासपोर्ट सेवा केंद्रे लवकरच उघडण्यात येणार आहेत. तसेच, तिसºया टप्प्यातील ५ पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू झाल्याने नागरिकांना पासपोर्ट मिळविणे सोपे होणार आहे.