ऐन दिवाळीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ! स्वीट होममध्ये आढळला ५० किलो भेसळयुक्त खवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 06:47 PM2021-10-30T18:47:39+5:302021-10-30T18:49:45+5:30
या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकल्यावर भेसळयुक्त खवा आढळून आला. पामोलिन तेल, दूध पावडर व रंग या पदार्थांपासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे
बारामती: दिवाळी अवघ्या तीन दिवसांवर ठेपली असताना बारामती शहरात अन्न औषध प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील एका स्वीट होमवर अचानक छापा टाकत भेसळयुक्त खवा जप्त केला आहे. हिंद स्वीट्स असे या दुकानाचे नाव आहे. भिगवण रस्त्यालगत असणाऱ्या या दुकानात ५० किलो भेसळयुक्त खवा आढळून आला. शनिवारी(दि ३०) दुपारी ही कारवाई करण्यात केली. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक खात्याचे अधिकारी राहुल खंडागळे यांनी या संदर्भात माहिती दिली.
या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकल्यावर भेसळयुक्त खवा आढळून आला. पामोलिन तेल, दूध पावडर व रंग या पदार्थांपासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. एकूण किलो खवा येथे आढळला आहे. पथकाला हा खवा पुरवणाऱ्या पुरवठादारांची नावे निष्पन्न झाली आहेत. हा खवा जप्त करण्यात आला आहे. मात्र त्या संदभार्तील नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल येण्यास २० दिवसांचा कालावधी लागेल, असे अन्न सुरक्षा अधिकारी राहुल खंडागळे यांनी सांगितले.
दुकानाचा परवाना नसल्याने हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दुकानदाराने बाहेरून खवा मागवला होता. त्यामुळे यामध्ये ज्यांच्याकडून या खव्याचा पुरवठा झालेला आहे, अशा पुरवठादारांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानात उत्पादक म्हणून नव्हे, तर या दुकानाने हा खवा येथे विक्रीसाठी ठेवला होता. मात्र या दुकानाकडे अन्नपदार्थ विकण्याचा परवाना नसल्याने या दुकानात बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे खंडागळे यांनी सांगितले. घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरु होते. अन्न व औषध प्रशासनाने दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली.
दरम्यान, दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणामुळे बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. त्यातच तयार फराळांना मागणी वाढत आहे. मात्र, आज झालेल्या कारवाईमुळे काही ठिकाणी होणारा काळा बाजार उघड झाला आहे. कारवाईच झाली नसती, तर भेसळयुक्त खव्याची विक्री होण्याचा धोका होता. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा धोका टळला आहे.