Omicron Variant: बारामतीत विनामास्क फिरणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:03 PM2021-11-30T20:03:55+5:302021-11-30T20:04:06+5:30
राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केल्यावर बारामती शहर पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत
बारामती : ओमायक्रॉन विषाणू दक्षिण आफ्रिकेमध्ये झपाट्याने पसरत आहे. त्याबाबत राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानंतर बारामती शहर पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नियमावलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरीकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडीक स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. नाकाबंदी करीत कारवाईला मंगळवारी सुरवात करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लागू केलेल्या नियमानुसार सर्वांनी सामाजिक आंतर पाळणे तसेच तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्यानंतर मास्क कारवाई पोलिसांनी कमी केली होती. परंतु शासनाच्या नवीन ‘गाईडलाईन’ आल्याने बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक कर्मचाऱ्यांसह स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. विनामास्क फिरणार यासाठी विशेष मोहीम व नाकाबंदी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. नागरीकांनी घराबाहेर पडताना, बाजारात फिरताना कार्यक्रमाला जाताना तोंडावर मास्क असणे अनिवार्य आहे. विना मास्क घराबाहेर रोडवर दुकानात मोटरसायकलवर कार मध्ये दिसून आल्यास नागरिकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पाचशे रुपये दंडाची पावती करण्यात येणार आहे.
इंदापूर चौकामध्ये पोलीस निरीक्षक महाडिक ,सहायक पोलीस निरीक्षक पालवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चार ते सहा वाजेपर्यंत नाकाबंदी केली. वीस जणांवर अद्यापपर्यंत कारवाई झालेली आहे. ही कारवाई बारामती शहरांमध्ये यापुढेही सतत सुरू राहणार आहे. नागरीकांनी विना मास्क घराबाहेर पडू नका. पोलिसांना कारवाईमध्ये सहकार्य करा,असे आवाहन पोलीस निरीक्षक महाडीक यांनी केले आहे.