बारामती : आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी जमीनीचे बेकायदा अधिग्रहण केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:01 PM2023-08-10T17:01:18+5:302023-08-10T17:04:04+5:30
प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले....
बारामती (पुणे) : मेडद (ता. बारामती) येथील नियोजित आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे गट नंबर ४०१—१ या जागेत काम सध्या सुरु आहे. त्यासाठी शासनाची गायरान जमीन ५.८७ हेक्टर जमीन अधिग्रहित केली आहे. तसेच मात्र, या कामासाठी गट क्रमांक ४१४—२ मधील २०७ जणांच्या ७/१२ वरील आमच्या हक्काच्या नावाच्या नोंदी रद्द करून आयुर्वेदिक कॉलेजची नोंद बेकायदेशीर पणे करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार बेकायदेशीर असल्याची तक्रार मेडद म्हाडा प्लॉटधारक कृती समितीच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. याबाबत समितीच्या वतीने गुरुवारी (दि १०) प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
याबाबत समितीचे अध्यक्ष आनंद धोंगडे यांनी सांगितले की, या महाविद्यालयासाठी ५ एकर क्षेत्राची गरज असताना जिल्हाधिकारी यांनी तीन पट म्हणजेच क्षेत्र १५ एकर अधिग्रहीत केली आहे. या जागेवर आयुर्वेदिक कॉलेज करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही. परंतू आमच्यावर अन्याय करून सदर जागेच्या लगत असलेल्या आमच्या मालकीच्या जागेतून आम्हाला हुकुमशाही पद्धतीने बाहेर काढण्याचा राजकीय दबाव वापरून प्रयत्न चालू आहे. बारामतीतील प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी आम्हाला कल्पना न देता ७/१२ वरील आमच्या हक्काच्या नावाच्या नोंदी रद्द करून आयुर्वेदिक कॉलेजची नोंद बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे धोंगडे यांनी सांगितले.
गट नंबर ४१४—२ मधील जागा म्हाडा पुणे यांच्या नावावर होती. त्यानंतर २०७७ ते २०१४ सालात कायदेशीर नोंदणीशुल्क भरुन कायम खुश खरेदी खताने आम्ही जवळपास २०७ जणांनी खरेदीखत करुन विकत घेतली आहे. आमच्या नावावर म्हाडा प्राधिकरणाने या जागेची ताबा पावती दिली आहे. ही जागा आमच्या वाहिवाटीत आहे. अजून आम्ही कुणालाही खरेदीखत करुन अगर कायदेशीर विक्री करुन ताबा दिलेला नाही. म्हाडा प्राधिकरणाने आमच्याकडून खरेदीखत पलटवून जागेचा ताबा कायदेशीर मार्गाने परत घेतला नाही. तसेच सह दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीचा व्यवहार म्हाडा प्राधिकरणाकडून झालेला नाही. त्यामुळे जागेची मालकी व ताबा पूर्णपणे आमच्या ताब्यात असल्याचा दावा धोंगडे यांनी केला आहे.