Baramati: ९ कोटी ६२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 08:34 PM2023-07-28T20:34:48+5:302023-07-28T20:37:54+5:30
बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
बारामती : आर्थिक फायद्यासाठी स्वत:च्या पदाचा गैरवापर करून ९ कोटी ६२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सह्याद्री अॅग्रो व डेअरी प्रा. लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत संतोष पोपटराव सावंत (रा. रितू अपार्टमेंट, छत्रपती संभाजीनगर, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष दुबे (रा. बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. येथील सह्याद्री अॅग्रो व डेअरी प्रा. लि. मध्ये सन २०१६ ते २०२१ या कालावधीत ही घटना घडली. या कंपनीच्या संचालक मंडळाने दुबे यांची मुख्य व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक केली होती. त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून कंपनी तोट्यामध्ये असल्याचे माहिती असताना देखील लाभांश मिळविण्यासाठी ती नफ्यामध्ये दाखवून कंपनीचे कर स्वरुपात १ कोटी ४० लाख २० हजार रुपयांचे नुकसान केले. स्वत:ला ५२ लाख ५४ हजार रुपयांचा लाभांश प्राप्त करून देय नसलेला ३७ लाख ४९ हजार रुपयांचा बोनस प्राप्त केला. रजेच्या दिवशी कर्तव्यावर न येता कर्तव्य प्राप्त केल्याचे दाखवून २२ लाख ५४ हजार रुपये प्राप्त केले. इतर वाहनांपेक्षा चढ्या दराने नातेवाइकांची वाहने कंपनीमध्ये लावून ४ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान केले. याशिवाय नोकरीवर काढले असतानादेखील कंपनीची भाडे तत्त्वावरील वाहने जमा न करता २ लाख ७१ हजार रुपयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरले.
नियुक्तीवर एकच चालक लागू असताना दोन चालकांचा वापर करून १३ लाख ८९ हजार रुपयांच्या नुकसानीस तसेच चढ्या दराने बिले दिल्याने गंगाजळीत टाकावी लागलेल्या २ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांच्या नुकसानीस तसेच एका ग्रुपसोबत जोपासलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे कंपनीस बँक व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या ४ कोटी १३ लाख ७३ हजार रुपयांच्या नुकसानीस असे ९ कोटी ६२ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान करून आर्थिक फसवणूक करून स्वत:चा गैरलाभ केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.