महिला विभागात बलाढ्य बारामती चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:25 AM2017-07-24T02:25:54+5:302017-07-24T02:25:54+5:30
पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व बाणेरच्या सतेज संघातर्फे आयोजित कबड्डी लीगमध्ये रविवारी बलाढ्य बारामती संघाने महिला गटातून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व बाणेरच्या सतेज संघातर्फे आयोजित कबड्डी लीगमध्ये रविवारी बलाढ्य बारामती संघाने महिला गटातून विजेतेदाला गवसणी घातली. पुरुष गटामध्ये लय भारी चिंपरी-चिंचवड संघाने विजेतेपदाचा मान मिळविला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. महिला गटामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात बारामती संघाने वेगवान पुणे संघावर २२-२१ असा निसटता विजय मिळवत बाजी मारली. मध्यंतराला बारामतीचा संघ ७-९ ने माघारला होता. नंतर मात्र या संघाच्या खेळाडूंनी जिगरबाज खेळ करीत सामना फिरविला. यात निर्णायक क्षणी मोलाचे योगदान दिले ते स्नेहा बिबवेने. तिने सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना एकाच चढाईत पुणे संघाच्या अंजली मुळे व कोमल गुजरला बाद करीत दोन गुण मिळविले आणि निकाल बारामतीच्या बाजूने झुकविला. याआधी सामना २०-२० ने बरोबरीत होता.
विजेत्या बारामती संघातर्फे श्रद्धा चव्हाणने ९, स्नेहा बिबवेने २ गुण मिळविले. त्यांना धनश्री सणस हिने ६ पकडी घेत चांगली साथ दिली. पुण्याची कर्णधार दीक्षा जोरी हिने ८ तर, आदिती जाधवने ७ गुण घेत प्रतिकार केला. कोमल गुजरने २ पकडी घेतल्या. मध्यंतरापूर्वी पुणे संघाकडे दोन गुणांची आघाडी असूनही अखेरच्या मिनिटाला सामन्यावरील पकड गमावल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुष विभागात पिंपरी-चिंचवड संघाने अंतिम फेरीत छावा पुरंदर संघावर ३८-२८ ने सरशी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मध्यंतराला विजेता संघ १३-१५ ने मागे होता. मात्र त्यानंतर विनीत कालेकरने केलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर या संघाने जोरदार मुसंडी मारत विजेतेपद प्राप्त केले. विनितने २ बोनस, ३ पकडींसह १२ गुण मिळवित आपल्या संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. त्याला प्रमोद घुले याने ४ गुण मिळवून आणि प्रवीण शिंदेने ४ पकडी घेत मोलाची साथ दिली. दरम्यान, पिंपरी-चिंचवडने पुरंदर संघावर २ लोण चढवले.
तत्पूर्वी, सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटांत पुरंदरने पिंपरी-चिंचवडवर लोण लावला. मध्यंतरापर्यंत अटीतटीची झुंज देणाऱ्या पुरंदरच्या खेळाडूंना नंतर मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पुरंदरच्या विवेक घुले याने १७ गुण मिळविले. ओंकार जगताप याने २ गुणांसह २ पकडी घेत ४ गुण मिळविले, तर निखिल ससार याने ३ पकडी घेत चांगला प्रतिकार केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष संग्राम कोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजा कड, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष, तसेच स्पर्धेचे मुख्य संयोजक नगरसेवक बाबूराव चांदेरे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष मधुकर नलावडे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले, राष्ट्रीय खेळाडू वासंती बोरडे, विजया सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, रूपाली दाभाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निकाल : अंतिम फेरी
महिला गट : बलाढ्य बारामती : २२ (श्रद्धा चव्हाण ९, धनश्री सणस ६, स्नेहा बिबवे २) विवि वेगवान पुणे : २१ (दीक्षा जोरी ८, अदिती जाधव ७, कोमल गुजर २).
पुरुष गट : लय भारी पिंपरी-चिंचवड : ३८ (विनीत कालेकर १२, प्रमोद घुले ४, प्रवीण शिंदे ४)
विवि छावा पुरंदर : २८ (विवेक घुले १७, ओंकार जगताप ४, निखिल ससार ३).