बारामतीचा ‘काॅइनमॅन’; २४०० वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ, नाणी व नोटांचा संग्रह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:21 IST2025-02-07T18:20:22+5:302025-02-07T18:21:14+5:30
वयाच्या दहाव्या वर्षापासून जोपासलाय अनोखा छंद

बारामतीचा ‘काॅइनमॅन’; २४०० वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ, नाणी व नोटांचा संग्रह
बारामती : २४०० वर्षांपूर्वीच्या भारतीय नाण्यांचा ऐतिहासिक वारसा बारामतीकर युवकाने जपला आहे. राकेश रंजना अनंतराव शहाणे असे या युवकाचे नाव आहे. २४०० वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ नाणी व नोटांचा संग्रह केल्याने बारामतीकरांनी त्याला ‘बारामतीचा काॅइनमॅन’ हे नाव देखील दिले आहे.
सातवीत असल्यापासून वयाच्या दहाव्या वर्षापासून राकेश यांनी हा अनोखा छंद जोपासला आहे. ते येथील बारामती सहकारी बँकेत नोकरीला आहेत. जुनी नाणी, नोटा गोळा करण्याचा हा छंद त्यांची ओळख बनू पाहत आहे. त्यांच्या पत्नी शिवकन्या यांचा देखील यामध्ये मोलाचा वाटा आहे. सध्या त्यांच्या संग्रहामध्ये २४०० वर्षांपासूनची दुर्मिळ नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुवर्ण होन सह ८० प्रकारची नाणी, रायगडी शिवराई, डेटेड-डॉटेड शिवराई, दुदांडी शिवराई, संस्थानांची दुर्मिळ सुवर्ण, चांदी, रौप्य अशी नाणी, चंद्रगुप्त माैर्याच्या काळातील नाणं, मुघल, निजाम, खिलजीच्या काळातील नाणी, २०० देशातील नाणी व नोटा, भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या १००, ५०००, १०००० रुपयांच्या फापडा नोटा, जगभरातील २०० देशांंच्या नोटा, पोस्टाचे तिकिटे आणि नाण्यांपासून बनवलेल्या वस्तू, समाज सुधारकांंच्या वाढदिवसाची तारीख असलेल्या नोटा, भारताच्या १५० संस्थानांचे मोडी लिपीतील लिखाण केलेले स्टॅम्प पेपर , प्रत्येक संस्थानिक राजाचे नाणे इत्यादी यांचा इतिहासकालीन साठा आहे.
याबाबत राकेश यांनी ‘लोेेकमत’शी बोलताना त्यांनी मोठ्या कष्टाने जिद्दीने जपलेल्या छंदाचा प्रवास उलगडला. त्यांनी सांगितले की, लहानपणी सातवीत असल्यापासून हा छंद मी जोपासला आहे. या दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करणाऱ्यांना नुमिसमॅटीस म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडून या नाण्यांचे लिलाव होतात. यातून, तसेच मित्रपरिवार, नागरिक, इतिहासप्रेमींकडून काही नाणी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी सातारा, कोल्हापूर भागातून मिळविली आहेत. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील नाणे संभाजीनगर येथून मिळविले. नवीन पिढीला आता डिजिटल व्यवहारामुळे या इतिहासकालीन नाण्यांची माहिती नाही. त्यामुळे पत्नी शिवकन्या यांच्या संकल्पनेतून बारामतीत प्रथमच ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन आयोजित केले आहे.
निराधारांना करणार मदत
शहरातील नटराज नाट्य कला मंदिर येथे हे सशुल्क प्रदर्शन होणार आहे. यातून मिळणाऱ्या रकमेतून अर्धी रक्कम निराधार मुलांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. नवीन संकलन, संग्रह सुरक्षितता यासाठी वापरण्यात येणार आहे. या नाण्यांच्या संकलनासाठी स्वतंत्र रुमची सोय केली आहे. यामध्ये १०० फ्रेम बनविण्यात आल्या आहेत. बँक ऑफ इंडियाने जारी केलेले १० रुपये ते १००० रुपयांचे चांदीची नाणी देखील माझ्या संग्रहात आहेत. शिवजयंती, गणपती उत्सवाला व इतर सर्व समाज सुधारकांच्या जयंतीला मी माझा पूर्ण संग्रह प्रदर्शनात मांडण्यासाठी देत असतो. येत्या काही दिवसात मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराई चलनावर एक पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे राकेश यांनी सांगितले.
जगातील पहिले प्लास्टिक नाणे
ट्रान्सनिस्ट्रीया या देशाने जगात प्रथमच प्लास्टिकची नाणी निर्माण केली आहेत. १ ,२ आणि १० रुपयांची ही नाणी बारामतीच्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. बारामतीच्या इतिहासात प्रथमच नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये ५ ते ६ हजारांपेक्षा अधिक नाणी या प्रदर्शनात असतील, असे राकेश शहाणे यांनी सांगितले.
बारामतीत देखील होती टांकसाळ
नाणी बनविण्याच्या कारखान्याला टांकसाळ असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बारामतीत देखील टांकसाळ होती. या काळातील नाण्यांच्या, सोन्याच्या होनची प्रतिकृती, काही नाणी आपल्याकडे असल्याचा दावा राकेश शहाणे यांनी केला आहे.
२०० देशातील नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे आणि नाण्यांपासून बनवलेल्या वस्तूंचाही संग्रह
भारताच्या १५० संस्थांनांचे मोडी लिपीतील लिखाण केलेले स्टॅम्प पेपर, प्रत्येक संस्थानिक राजाचे नाणे आदींचा इतिहासकालीन साठा आहे.