३५ वर्षांनंतर सुरू झाले बारामती कापसाचे लिलाव; प्रतिक्विंंटलला मिळाला उच्चांकी दर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:23 PM2022-11-02T18:23:16+5:302022-11-02T18:27:28+5:30
पहिल्याच दिवशी ३० क्विंटल आवक...
बारामती (पुणे) :बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावास सुरूवात झाली. बुधवारी (दि. २) उघड लिलाव पद्धतीने कापूस खरेदी-विक्रीचा शुभारंभ झाला. यावेळी शिरवली येथील शेतकऱ्याला प्रतिक्विंटल ८ हजार ९०१ रूपये असा उच्चांकी दर मिळाला. ३५ वर्षांनंतर कापूस लिलाव सुरू झाल्याची आठवण येथील ज्येष्ठ उद्योजक जवाहर वाघोलीकर यांनी यावेळी सांगितली.
बारामती मर्चन्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जवाहर वाघोलीकर व बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, प्रशासक मिलिंद टांकसाळे यांच्या हस्ते कापूस लिलावाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जवाहरशेठ वाघोलीकर म्हणाले, बारामती बाजार समितीची ओळख पूर्वी कॉटन मार्केट म्हणून ओळख होती. १९७७ पूर्वी बारामती बाजार समितीच्या आवारात एक ते दीड लाख क्विंटल कापसाची आवक होत होती. ३५ वषार्नंतर परत कापसाचे लिलाव होत असल्याने आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात बारामती बाजार आवारात कापसाची मोठी आवक होईल व कॉटन मार्केट म्हणून बारामती बाजारपेठ पुन्हा आपली ओळख निर्माण करेल.
तालुक्यातील इतर संस्थांनी कापसासाठी जिनिंग उभारून सहभाग घ्यावा. त्यामुळे कापसाला चांगले दिवस येतील. बाजार समितीने आवक व कापूस लागवड वाढी बाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. कापूस पिकावर परिसंवाद घेऊन शेतकऱ्यांना उत्पादन वाढीबाबत माहिती द्यावी. तसेच व्यापाऱ्यांना सुविधा देऊन कापसासाठी शेड उभारावे असे मत वाघोलीकर यांनी व्यक्त केले.
पहिल्याच दिवशी ३० क्विंटल कापसाची आवक...
पहिल्या दिवशी कापसाची ३० क्विंटलची आवक झाली. यावेळी कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार ९०१ रूपये एवढा उच्चांकी दर मिळाला. तर सरासरी ७ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दर निघाला. येथील व्यापारी कल्पेश सोनवणे यांच्या आडतीवर शिरवली येथील शेतकरी राजेंद्र जानू मदने यांच्या कापसास ८ हजार ९०१ उच्चांकी दर मिळाला. यावेळी बाळासाहेब फराटे, शिवाजी फाळके, उमेश सोनवणे, केशवराव मचाले यांच्या आडतीवर कापसाची आवक झाली.
खरेदीदार म्हणून अमोल वाडीकर, संभाजी किर्वे, निलेश भिंगे, बाळासो फराटे यांनी सहभाग घेतला. कापूस लिलावावेळी शेतकरी, खरेदीदार, आडते स्वागत प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी केले. यावेळी बारामती बाजार समितीचे माजी सदस्य रमेशराव गोफणे, अनिल खलाटे, सुनिल पवार, दत्तात्रय सणस, राजेंद्र बोरकर, ज्ञानदेव कदम, सुर्यकांत गादिया, शरद भिंगे व बाजार समितीचे माजी सचिव शिर्के साहेब, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर, मिलिंद सालपे तसेच इतर व्यक्ती व समितीचे सेवक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आभार बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी मानले.
कापसाचे लिलाव दर बुधवार व शनिवार या दिवशी सकाळी ११.०० वाजता सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांनी आपला कापूस स्वच्छ व निवडून आणावा. त्यामुळे आणखी चांगला दर मिळेल. कापूस हे नगदी पिक हमखास उत्पन्न देणारे आहे. आज बारामती व फलटण या तालुक्यातून कापसाची आवक झाली.
- अरविंद जगताप
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती