बारामती-दौंड रेल्वेमार्गाचे होणार विद्युतीकरण
By admin | Published: June 16, 2017 04:39 AM2017-06-16T04:39:55+5:302017-06-16T04:39:55+5:30
पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर आता दौंड-बारामती रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटी रुपयांची तरतूद
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण झाल्यानंतर आता दौंड-बारामती रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हे काम लवकरच मार्गी लागणार आहे.
आज रेल्वेचे अधिकारी, नगरपालिका पदाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी रखडलेल्या सेवा रस्त्यासाठी रेल्वेने परवानगी द्यावी, यासह अन्य मागण्या केल्या.
पश्चिम महाराष्ट्रातील खासदारांची रेल्वेच्या प्रश्नावर शुक्रवारी (दि. १६ जून) पुण्यात बैठक आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने बारामती रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत असलेल्या अडचणींच्या बाबतीत आढावा बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्यासह मुख्याधिकारी मंगेश चितळे, रेल्वेचे सहाय्यक कमर्शिअल प्रबंधक व्ही. एस. कांबळे, खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, सहाय्यक सिद्धेश्वर शिंपी, नगरपालिकेचे अभियंता रत्नरंजन गायकवाड, रेल्वेचे विभागीय अभियंता प्रसन्न सोनवणे, नितिन सातव, अनिता गायकवाड, राजेश कांबळे, सतिश फाळके, बारामती रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
रेल्वे स्थानक
कॅमेऱ्याच्या नजरेत
रेल्वे स्थानकात विश्रांतीगृहाचे सुशोभीकरण, सुविधा तसेच रेल्वे स्थानकावर आत, बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याची पूर्तता खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत तातडीने केली जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.
मालधक्का स्थलांतरित करा
बारामती रेल्वेच्या संदर्भात पहिल्यांदाच आढावा घेण्यात आला. बारामती शहरातील रेल्वेच्या मालधक्क्याचे मागील २० वर्षांपासून स्थलांतरित करण्याची मागणी आहे. या मालधक्क्यामुळे भिगवण रस्त्यावर धावणाऱ्या अवजड गाड्यांमुळे अनेकदा अपघात झाले. आता यावर पुण्यातील आढावा बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले जाईल़