बारामती: प्रसूतीवेळी नवजात बालकाचा मृत्यू, निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 01:40 PM2023-09-21T13:40:57+5:302023-09-21T13:41:35+5:30
डाॅक्टरांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवल्यानंतर शहर पोलिसांनी येथील तुषार रामचंद्र गदादे या डाॅक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे....
बारामती (पुणे) : बारामती शहरातील डिसेंबर २०२२ मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी अखेर संबंधित डाॅक्टरांवर निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या प्रसूतीवेळी डाॅक्टर उपस्थित राहिले नाहीत. परिणामी नवजात बालक मृत पावल्याप्रकरणी नेमलेल्या शासकीय समितीने डाॅक्टरांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवल्यानंतर शहर पोलिसांनी येथील तुषार रामचंद्र गदादे या डाॅक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मागील वर्षी दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी बारामतीत ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण मोरे यांनी फिर्याद दिली आहे. यासंबंधी यापूर्वी नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद शहर पोलिस ठाण्यात होती. या बालकाची आई डाॅ. गदादे यांच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल होती. तिला डाॅक्टरांनी प्रसूतीसाठी दाखल करून घेतले. त्यावेळी सिझर करावे लागेल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर डाॅक्टरांनी तेथे उपस्थित राहणे अपेक्षित असताना ते बाहेर गेले. दरम्यान, रुग्ण महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्या. बाळाचे पाय बाहेर आले, परंतु गुदमरून बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर डाॅक्टर आले. डाॅक्टर उपस्थित असते तर बालकाचा मृत्यू झाला नसता, अशी तक्रार महिलेच्या नातेवाइकांनी केली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे अहवालाची मागणी करण्यात आली होती.
चौकशी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. तसेच याबाबत चाैकशी समितीने ३० ऑगस्ट रोजी अहवाल दिला. त्यामध्ये डाॅक्टरांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा याला कारणीभूत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी डाॅक्टरविरोधात भादंवि कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.