बारामतीत गुटखाबंदीला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:35 AM2018-11-27T01:35:44+5:302018-11-27T01:35:56+5:30
राज्यात सन २०१२ पासून गुटखाबंदी करण्यात आली.
बारामती : राज्यात सन २०१२ पासून गुटखाबंदी करण्यात आली. मात्र, गुटखाबंदी नावालाच असल्याचे चित्र आहे. बारामती शहरात सर्वत्र खुलेआम गुटखाविक्री सुरू असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये उघडकीस आले आहे. शहरात सर्वत्र गुटखा खाऊन टाक लेल्या पुड्यांचा खच पडला आहे. स्थानिक पोलिसांना न दिसलेली गुटखाविक्री कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या नजरेतून मात्र सुटली नाही. रविवारी त्यांनी केलेल्या कारवाईत गुटखाविक्रेते शहरात सक्रिय असल्याचे पुढे आले आहे.
इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथे रविवारी (दि. २५) कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने गुटखाविक्री करणाऱ्यांवर छापे टाकले. लाख रुपयांचा तंबाखूजन्य गुटखाविक्रीचा साठा या वेळी केलेल्या कारवाईत सापडला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाला न दिसलेली गुटखाविक्री मात्र स्थानिक पोलिसांना का दिसली नाही, अशी चर्चा सुरु आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाच्या कारवाईमुळे सर्वत्र गुटखाबंदी नावापुरतीच असून खुलेआम विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. बारामतीत देखील गुटखाविक्री अनिर्बंधपणे सुरु आहे. गुटखा सहजपणे कोठेही उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागात चेहरे पाहून गुटखाविक्री केली जाते. मात्र, शहरात कोणालाही सहजपणे गुटखाविक्री केली जाते. गुटखा खाऊन सहजपणे रिकाम्या पुड्या टाकून दिल्या जातात. पानटपरी व्यावसायिक या रिकाम्या पुड्या जाळून गुटखाविक्रीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक ठिकाणी अर्धवट जळालेल्या पुड्या खुलेआम सुरु असलेल्या गुटखाविक्रीची साक्ष देतात. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने बारामतीमध्ये देखील कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राजगुरुनगरला पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त
राजगुरुनगर : शहरात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा गुटखा सोमवारी पोलीस व अन्न औषध प्रशासनाने जप्त केला. महाराष्ट्रात २० जुलै २०१८ पासून पुढे एक वर्षासाठी गुटखा पानमसाला याच्या उत्पादन, विक्री, वाहतूक व वितरण यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याने शासनाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.
राजगुरुनगर परिसरात गुटख्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना आणि अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पाबळ रस्त्यावरील ए-वन एजन्सी या दुकानावर पोलिसांनी धाड टाकली. या दुकानातून जवळपास १ लाख ७७ हजार ८८० तर वाडा रस्त्यावरील मोमीन ट्रेडर्स या दुकानातून २ हजार ८२० रुपयांचा गुटखा खेड पोलिसांनी जप्त केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.