बारामतीतील शेतकरी पुतळा उद्ध्वस्त

By admin | Published: February 10, 2015 01:19 AM2015-02-10T01:19:13+5:302015-02-10T01:19:13+5:30

बारामती नगरपालिकेच्या जागेतील पाण्याच्या टाकीचे स्थलांतर करून जागा बळकाविल्यानंतर ४० वर्षांपूर्वी लायन्स क्लबने

Baramati farmer destroyed the statue | बारामतीतील शेतकरी पुतळा उद्ध्वस्त

बारामतीतील शेतकरी पुतळा उद्ध्वस्त

Next

बारामती : बारामती नगरपालिकेच्या जागेतील पाण्याच्या टाकीचे स्थलांतर करून जागा बळकाविल्यानंतर ४० वर्षांपूर्वी लायन्स क्लबने पालिकेच्या जागेत उभारलेल्या उद्यानातील शेतकरी पुतळादेखील तोडून टाकला आहे. ही पुतळ्याची जागादेखील बळकाविणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी, हा पुतळा पाडून त्याच जागी दुसरा पुतळा उभारणार असल्यामुळे पाडला, असे सांगितले.
मात्र, रातोरात पुतळा पाडल्याने माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या बारामतीतच शेतकरी पुतळा उद्ध्वस्त केल्याने नगरपालिकेतील मनमानी कारभाराचा प्रकार पुन्हा पुढे आला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने अडथळा ठरलेला हा पुतळा पाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सन १९७१ मध्ये लायन्स क्लबने शेतकरी उद्यानाची निर्मिती केली होती. या ठिकाणी नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे. तसेच पाटबंधारे खात्याचीदेखील जागा आहे. पाटबंधाऱ्याच्या जागेवर नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे. हे नाट्यगृह बेकायदेशीर बांधले आहे. या प्रकारची जनहित याचिका २००१ मध्ये अ‍ॅड. श्याम पोटरे यांनी दाखल केली आहे. २ वर्षांपूर्वी नगरपालिकेने त्याच परिसरात नटराज नाट्यगृहाच्या लगतच जुनी पाण्याची टाकी होती. ती टाकी पाडून नव्याने उभारण्याचा ठराव करण्यात आला. टाकी पाडण्यात आली. टाकी तेथून स्थलांतरित करण्यात आली. सध्या ही जागादेखील याच मंडळाकडून वापरली जात आहे. याच परिसरात नगरपालिकेच्या उद्यान विभाग, अग्निशमन विभागासह इतर खात्याच्या गाड्या लावण्यात येतात. त्यांना जागा कमी पडत होती. पाण्याची टाकी पाडल्यानंतर या जागेचा वापर करणे नगरपालिकेला शक्य होईल. पण असे असताना टाकी पाडल्यानंतर मोकळी झालेली जागादेखील बळकावण्यात आली आहे. नगरपालिकेच्या गाड्या लावण्यासाठी शाळेच्या खेळाच्या मैदानाचा वापर पालिकेला करावा लागत आहे.
१४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून उभारलेला शेतकरी पुतळा न्यायालयाचा आदेश डावलत तोडण्यात आला आहे. या प्रकाराला नगरपालिका प्रशासन, पदाधिकारीदेखील हतबल झाले आहेत. जनहित याचिकेवर सुनावणी अंतिम टप्प्यात असतानाच हा प्रकार झाला आहे. पुतळ्याच्या परिसरातच नाट्यगृह आहे. मागील ४० ते ४२ वर्षांपासून बारामतीकरांचे आकर्षण ठरलेले शेतकरी उद्यान नाट्यगृहामुळे उद्ध्वस्त झाले. उसाची मोळी घेतलेला शेतकरी आता इतिहासजमा झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Baramati farmer destroyed the statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.