बारामती: सातव चौकातील घरफोडीप्रकरणी चार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:39 PM2023-08-21T12:39:33+5:302023-08-21T12:41:26+5:30
सदनिका चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा जवळपास सात लाखांचा ऐवज लंपास केला होता...
बारामती : शहरातील सातव चौकातील सदनिका फोडून जवळपास सात लाखांचा ऐवज चोरीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑगस्ट रोजी सातव चौकातील रम्यनगरीमधील चरणसिंग किसन चव्हाण हे बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांची सदनिका चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा जवळपास सात लाखांचा ऐवज लंपास केला होता.
त्यानंतर, शहर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलिस निरीक्षक गंधारे, अमित पाटील, युवराज घोडके व इतर पोलिस कर्मचारी यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला.
यामध्ये पोलीसांनी हेमंत उर्फ बारक्या बड्या पवार, कुत्या रमेश पवार (दोघेही. रा.जामदार रोड, बारामती), सुमित आदित्य पवार (रा.माळेगाव, बारामती) व विजय देख्या भोसले (रा.जामदार रोड, शिवाजीनगर) यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी सांगितले की, घरफोडी घटनेप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. पोलिस त्यांच्याकडे कसून तपास करीत आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून, सर्व घरफोड्या उघडकीस येतील, असा विश्वास भोईटे यांनी व्यक्त केला.