India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:33 PM2022-02-22T17:33:34+5:302022-02-22T17:38:41+5:30
युनिटी फॉर रन या या संकल्पनेतून बारामती येथील सादीया सय्यद या युवतीने मुंबई ते पुणे १६१ कि.मी. अंतर सोलो रनिंग करीत पूर्ण केले
बारामती : युनिटी फॉर रन या या संकल्पनेतून बारामती येथील सादीया सय्यद या युवतीने मुंबई ते पुणे १६१ कि.मी. अंतर सोलो रनिंग करीत पूर्ण केले. शिवजयंतीच्या निमित्ताने तिने हि दौड पुर्ण केली. या सोलो रनची नोंद २०२२ सालच्या इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये घेण्यात आली.
१८ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथून सादियाच्या सोलो रनला प्रारंभ झाला. हे सोलो रन दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले. पहिला टप्पा ९५ किमी मुंबई ते लोणावळा ,तर लोणावळा मुक्कामानंतर लोणावळा ते लाल महाल, पुणे या दुसऱ्या टप्प्यात उरलेले अंतर तिने धावून पूर्ण केले. १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ३.२० वाजता लाल महाल येथे दीपक मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादीयाचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांच्या मार्फत सर्व खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या आदरातिथ्याने खेळाडू चांगलेच भारावले. बारामती मधून पहिला ऑलिम्पिक वीर घडावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. फाऊंडेशनच्या सदस्या सादिया यांच्या कामगिरीने नक्कीच द्विगुणित झाला आहे, असे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ननवरे यांनी सांगितले.
सादीयाला प्रोत्साहन देण्यासाठी बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्यास राजू भिलारे नानाजी सातव, अजिंक्य साळी, मच्छिंद्र आटोळे, रवींद्र पांढकर, शिरीष शिंदे, संजयजी जगताप, अशोक (मामा) पवार, राष्ट्रीय नेमबाज खेळाडू शिवानी सातव, वैष्णवी ननवरे आदी उपस्थित होते.