गेली १० वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान - सुनेत्रा पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 01:01 PM2024-05-01T13:01:43+5:302024-05-01T13:02:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराचा खासदार बारामतीतून निवडून दिला तर ‘ट्रिपल इंजिन’ची ताकद मिळणार
पुणे : ‘गेली दहा वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रचंड नुकसान झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प येऊ शकला नाही. विकासाचा दहा वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याचा निर्णय यंदा जनतेने घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील जनता घड्याळापुढचे बटण दाबून मला आशीर्वाद देईल,’ असा विश्वास महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. ‘पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या नवख्या उमेदवार’ असा प्रचार विरोधकांनी चालविला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना सुनेत्रा पवार बोलत होत्या. राज्यातील हाय-व्होल्टेज लढत म्हणून बारामतीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुनेत्रा पवार यांच्याशी झालेला संवाद.
प्रश्न : पहिली निवडणूक, प्रचारदौरे आणि निवडून आल्यास दिल्ली. हे सारे आव्हानात्मक वाटते का?
सुनेत्रा पवार : सर्वप्रथम लोकमतच्या सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या, तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लोकशाहीतील देशातील सर्वोच्च सदन म्हणजे संसद. भारतीय संसदेस उज्ज्वल परंपरा आणि प्रतिष्ठा आहे. त्या अर्थाने संसदेत जाणे आव्हानात्मक आहे. मात्र, माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्याचे प्रभावी व्यासपीठ, म्हणून संसदेकडे पाहते, तेव्हा मला हे आव्हान जाणवत नाही. पहिल्यांदाच निवडणूक लढवीत असल्याचाही ताण नाही, कारण जनहितासाठी राजकारण हे माझ्यासाठी स्पष्ट आहे. गावगाड्याला सोबत घेऊन कसे जायचे, अडल्यानडल्यांची कामे मार्गी कशी लावायची, समाजातील शेवटच्या माणसाचे प्रश्न कसे सोडवायचे, याची शिकवण मला लहानपणापासून आहे. गेली पंचवीस-तीस वर्षे मी सामाजिक कार्यात आहे. लोकांच्या समस्या समजून घेण्याची कळकळ आणि लोकांचे प्रश्न सोडविण्याची धमक माझ्यात आहे.
प्रश्न : बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने आपल्याला का संधी द्यावी, असे वाटते?
सुनेत्रा पवार : गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून विरोधी बाकांवर बसणारा प्रतिनिधी निवडून गेला. तरीदेखील केंद्रातील मोदी सरकारनेच या मतदारसंघात रस्ते, महामार्ग, रेल्वेमार्ग, पूल अशी विविध विकासकामे केली, हे जनता पाहत आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी पुन्हा देण्याचा निर्णय यंदा देशाच्या जनतेने घेतला आहे. अशावेळी आपला प्रतिनिधीदेखील मोदींना साथ देणारा असेल, तर मतदारसंघाचा विकास वेगाने होईल, हे सुज्ञ मतदार ओळखून आहेत, म्हणून या वेळी मोदींना साथ देणारा लोकप्रतिनिधी निवडून पाठविण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे मला प्रचारासाठी फिरताना जाणवते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यातील सरकार दमदार काम करीत आहे. नरेंद्र मोदी यांनी देशात एक नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्यांच्याच विचाराचा खासदार बारामतीतून निवडून दिला, तर बारामती लोकसभा मतदारसंघातील विकासाला ‘ट्रिपल इंजिन’ची ताकद मिळणार आहे. मोदी, शिंदे, फडणवीस, अजितदादा हे सगळे नेते धडाडीने काम करणारे ‘टास्क मास्टर’ आहेत. जनता काम करणाऱ्यांनाच संधी देईल, याची मला खात्री आहे.