बारामती: माळेगावात चारचाकीत सुरू होते अवैध गर्भलिंगनिदान; डाॅ. शिंदेसह दलाल अटकेत
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 8, 2024 07:17 PM2024-06-08T19:17:50+5:302024-06-08T19:19:11+5:30
याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे डाॅ. शिंदेला अशा प्रकारच्या गुन्हयात अनेकवेळा अटक झाली आहे.....
बारामती/पुणे : पुण्याच्या ग्रामीण भागात मुलींची गर्भातच कळी खुडण्याचा प्रकार सर्रासपणे सूरू आहे. बारामतीमधील माळेगावच्या गाेफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी पाेर्टेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे गर्भलिंगनिदान साेनाेग्राफी करणा-या डाॅक्टरसह एजंटाला माळेगाव पाेलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाेर्टेबल साेनाेग्राफी मशीनही जप्त केले आहे. याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे डाॅ. शिंदेला अशा प्रकारच्या गुन्हयात अनेकवेळा अटक झाली आहे.
गर्भलिंग निदान करणारा डाॅ. मधुकर चंद्रकांत शिंदे (वय ५२, रा. लक्ष्मीनगर, फलटण, जि. सातारा) आणि एजंट नितीन बाळासाहेब घुले (वय ३७, रा. ढेकळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे या दाेघांना पाेलिसांनी पाठलाग करून पकडले आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागात चारचाकी गाडीमध्ये गर्भलिंगनिदान हाेत असल्याची तक्रार पुण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांच्याकडे प्राप्त झाली हाेती. त्या तक्रारीच्या अनुशंगाने डाॅ. यमपल्ले यांनी शिक्रापुर, यवत, दाैंड, इंदापुर व बारामती येथील वैदयकीय अधीक्षकांना पत्र लिहून याेग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या हाेत्या. त्याअनुषंगाने बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. जगताप यांनी पाेलिसांना डाॅ. शिंदे बाबत माहीती दिली हाेती.
काॅल रेकाॅर्डवरून लागला छडा
याप्रकरणी पाेलिसांनी डाॅ. शिंदे याच्या माेबाईलचे काॅल रेकाॅर्ड तपासले असता ताे एजंट बाळासाहेब घुले याच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यानुसार बारामती पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक युवराज घाेडके यांनी डाॅ. शिंदे आणि एजंट घुले या दाेघांना शुक्रवार दि. ७ जून राेजी गाेफणेवस्ती येथे साेनाेग्राफी मशीनसह पकडले. त्यांच्यावर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व राेग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियम नुसार माळेगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास माळेगाव पाेलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी भांगे करत आहेत.
डाॅ. शिंदे सराईत-
यामध्ये अटक करण्यात आलेला डाॅ. मधुकर शिंदे हा या प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत आहे. त्याच्यावर याआधी दाैंडमध्ये तसेच सातारा येथेही गुन्हे दाखल आहेत. ताे एजंट घुलेच्या मार्फत गर्भलिंग निदान करणा-या महिलांची पाेर्टाेबल साेनाेग्राफी मशीनद्वारे साेनाेग्राफी करून त्यांच्याकडून लाखाे रूपये उकळत असल्याचे उघडकीस आले आहे.