बारामतीत रविवारी होणार जनआक्रोश मोर्चा; देशमुख कुटुंबिय होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:15 IST2025-03-06T15:13:54+5:302025-03-06T15:15:00+5:30
Santosh Deshmukh Murder Morcha: स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.

बारामतीत रविवारी होणार जनआक्रोश मोर्चा; देशमुख कुटुंबिय होणार सहभागी
बारामती - स्व. संतोष देशमुख यांच्या निघून हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने बारामतीत शनिवारी (दि ८) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता हा मोर्चा रविवारी (दि ९) होणार आहे.यावेळी मोर्चामध्ये देशमुख कुटुंबिय सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
बारामती शहरात शनिवारी(दि ८) जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.मराठा समाजाने या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील जिजाऊ भवन येथे तातडीने बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी मोर्चाच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी बारामती बंद आणि सर्वधर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, स्व. संतोष देशमुख यांचा महिना (श्रद्धांजलीचा दिवस) हा ८ मार्च रोजी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना या मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही. त्यांच्या भावना विचारात घेऊन आणि त्यांना या आंदोलनात सामील होता यावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा आयोजित निषेध मोर्चा रविवारी (दि ९) आयोजित करण्यात आला आहे.
या मोचमिध्ये स्व. संतोष देशमुख यांचे बंधु, मुलगी आणि इतर कुटुंबीय देखील सहभागी होणार आहेत. हा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मोर्चा सुरु होणार आहे.कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला सुरवात होइल.संतोष देशमुख यांच्या हत्येचे दु:ख झालेले सर्व जाती धर्माचे नागरीक मोर्चात सहभागी होतील.मोर्चा नेहमीच्या मार्गाने भिगवण चाैक येथे दाखल होईल.