Baramati Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची मोर्चेबांधणी सुरू; दौंडमधील प्रेमसुख कटारिया यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 06:17 PM2024-04-07T18:17:49+5:302024-04-07T18:18:19+5:30
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण जोरदार तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे समर्थक मानले जाणाऱ्या प्रविण माने यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. माने यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचारही सुरू केला आहे. दरम्यान, आज खासदार शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी दौंडमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आज खासदार शरद पवार दौंड दौऱ्यावर आहेत, त्यांनी भाजपा आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय दौंड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली. यावेळी कटारिया आणि पवार यांनी बंद दाराआड सुमारे २० मिनिट चर्चा केली. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. कटारिया यांची गेल्या अनेक वर्षापासून दौंड नगर परिषदेवर सत्ता आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे वीरधवल जगदाळे यांचे कटारिया हे कट्टर विरोधक आहेत.
प्रविण मानेंचा महायुतीला पाठिंबा
दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे समर्थक मानले जाणारे प्रविण माने यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आज पत्रकात परिषद घेत माने यांनी भूमिका स्पस्ट केली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडले. नंतर माने यांनी शरद पवार यांना पाठिंबा व्यक्त केला होता. तसेच सुप्रिया सुळे यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होत तालुक्याची धुरा हाती घेतली होती. सुळे यांची सर्व भिस्त माने यांच्यावर होती. मात्र शरद पवार यांच्या इंदापूर येथील जाहीर सभेला अनुपस्थित राहिल्याने अनेक चर्चाना उधाण आले होते. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने व कुटुंबीयाची यांची भेट घेतली.
या भेटीनंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. निवडणुका तोंडावर असतानाच माने यांच्या महायुती पाठिंब्यामुळे सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसणार आहे. माने यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माने यांच्या पाठिंब्याने महायुतीच्या उमेदवार सूनेत्रा पवार यांना मोठा फायदा होणार आहे. माने यांचे इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यात मोठे वलय आहे.