ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 11:42 PM2024-06-04T23:42:43+5:302024-06-04T23:46:51+5:30
अजित पवार यांना पत्नीच्या पराभवासह इतर आणखी दोन ठिकाणीही पक्षाच्या उमेदवारांचा पराभव पाहावा लागला.
Baramati Lok Sabha Result ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघातील ऐतिहासिक लढतीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारत विजयी चौकार लगावला. सुळे यांना यंदाच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या रुपाने कुटुंबातून आव्हान मिळालं होतं. मात्र मतदारसंघातील चांगला जनसंपर्क आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मतदारसंघात उसळलेल्या प्रचंड भावनिक लाटेमुळे सुप्रिया सुळे यांचा तब्बल १ लाख ५३ हजार मतांनी विजय झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्नीच्या पराभवासह इतर आणखी दोन ठिकाणीही पक्षाच्या उमेदवारांचा पराभव पाहावा लागला आणि केवळ रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे विजयी झाले. आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एकच जागा जिंकता आल्यानंतर अजित पवार यांनी पराभव मान्य करत पुन्हा नव्याने पक्षसंघटनेची बांधणी करणार असल्याचं म्हटलं. तर आता त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही आई सुनेत्रा पवार यांच्या पराभवाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पार्थ पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "माझ्या आईने या निवडणुकीत चांगली लढत दिली. ती पक्षासाठी आणि एनडीएसाठी लढली. ती आम्हा सगळ्यांसाठी विजयीच आहे. आमचं सगळ्यांचं तिच्यावर प्रेम आहे. पाठिंब्यासाठी सगळ्यांचे आभार," अशा शब्दांत पार्थ पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
I would like to say!!
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) June 4, 2024
My mom she fought well, she fought for her party and the NDA.
She is a winner for all of us!!
We all love her ❤️
Thank you all for your support!🙏🏻
अजित पवार नक्की काय म्हणाले?
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मानहानिकारक पराभव झाला. दुसरीकडे धाराशिवमध्येही भाजपकडून जागा घेतल्यानंतर अजित पवार गटाने तिथे अर्चना पाटील याना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचाही पराभव झाला. शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना खुले आव्हान देऊन अजित पवार यांनी इशाराच दिला होता. मात्र तिथेही राष्ट्रवादीच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या विजयाने राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाली आहे. या सगळ्यानंतर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे. नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं पुन:श्च अभिनंदन! पुनश्च धन्यवाद!," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.