Baramati Lok Sabha Result 2024: सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी
By नितीन चौधरी | Published: June 4, 2024 09:54 AM2024-06-04T09:54:39+5:302024-06-04T09:55:46+5:30
बारामती लोकसभेसाठी यंदा काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत एकमेकांना आव्हान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांतील राजकीय अनुभवाचे काका-पुतण्यांचे कसब यावेळी संपूर्ण बारामती मतदारसंघाने अनुभवले....
पुणे : मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेरीस सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) पिछाडीवर पडल्या आहेत. पवार यांना फक्त खडकवासला मतदारसंघातून लीड मिळाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून पवार यांना ५११ मतांची आघाडी मिळाली तर इतर पाच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीअखेरीस बारामती लोकसभा मतदारसंघातून सुळे यांनी ११ हजार ५३२ आघाडी घेतली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासलामधील लीड सोडता इतर ठिकाणच्या मतदारसंघात सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. तर सुप्रिया सुळेंनी लीड काय राखत तब्बल ११ हजार ५३२ मतांची आघाडी घेतली. सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून ३ हजार ४९४, इंदापूरमधून १ हजार ४९१, दौंडमधून ५२४, पुरंदरमधून १६२, भोरमधून ३६९ मतांची आघाडी घेतली आहे.
बारामतीत तिसऱ्या फेरीत सुप्रिया सुळे यांना २ हजार ५६४ मतांची आघाडी. एकूण तीन फेऱ्यानंतर सुप्रिया सुळे यांना १४ हजार ७३ मतांची आघाडी मिळाली आहे. सुनेत्रा पवार यांना भोर आणि खडकवासला मतदारसंघांमध्ये आघाडी मिळत आहे.
बारामती लोकसभेसाठी यंदा काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत एकमेकांना आव्हान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांतील राजकीय अनुभवाचे काका-पुतण्यांचे कसब यावेळी संपूर्ण बारामती मतदारसंघाने अनुभवले. ज्येष्ठ नेते शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच मुलीसाठी मैदानात उतरले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पत्नीसाठी राजकीय कारकीर्द पणाला लावल्याचे चित्र आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण पक्षाची नव्याने बांधणी केली. यामध्ये पवार यांनी जुन्या सवंगड्यांना बरोबर घेत नव्याने राजकीय पदासह निवडणुकीची जबाबदारी दिली. संपूर्ण निवडणुकीची सूत्रे हाती घेत मतदारसंघ पिंजून काढला. कोणताही अनुभव नसलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी प्रथमच राजकीय रिंगणात उतरविले; तसेच पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, तसेच सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या प्रथमच प्रचारात सहभागी झाल्या. दुसरीकडे अजित पवार यांचे बारामतीच्या सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, सहकारी बँकांवर वर्चस्व आहे. या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्या मतदानासाठी विभागून जबाबदाऱ्या घेतल्या. या सर्वांवर अजित पवार स्वत: लक्ष ठेवून होते.