बारामती लोकसभेसाठी होणार चुरशीची लढत; चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘राष्ट्रवादी’ला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:08 PM2022-09-07T13:08:38+5:302022-09-07T13:11:03+5:30
बावनकुळे म्हणाले, भाजप हा देशातील एक क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीत आमचा खासदार जिंकावा, अशी आमची भूमिका असून तयारी सुरू आहे.
बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघात झालेल्या राजकीय लढतींपैकी २०२४ची लढाई सर्वांत प्रभावी असेल, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले. बावनकुळे हे मंगळवारी बारामती दौऱ्यावर होते. काटेवाडी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीला आव्हान दिले.
बावनकुळे म्हणाले, भाजप हा देशातील एक क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीत आमचा खासदार जिंकावा, अशी आमची भूमिका असून तयारी सुरू आहे. भाजप - सेना युती बारामतीत जिंकेल, असा आमचा ‘स्पष्ट अजेंडा’ आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बाबी जनतेला पटत नाहीत. त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यंदा संपूर्ण देशात ४००पेक्षा अधिक, तर राज्यात बारामतीसह लोकसभेच्या जागांवर भाजप निवडून येईल. बारामती लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
...बारामतीचा गड त्यामानाने मोठा नाही -
देशात बडे राजकीय गड उद्ध्वस्त झाले आहेत, त्यात काही मोठे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीच केवळ देश मजबूत करू शकतात, हे जनतेला समजले आहे. देशात अनेक राजकीय गड उद्ध्वस्त होतील. बारामतीतील राष्ट्रवादीचा गड त्या मानाने फारसा मोठा नाही, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
निर्मला सीतारामन पूर्णवेळ प्रभारी -
- सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची पूर्णवेळ प्रभारीपदाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. सीतारामन या २३, २४, २५ सप्टेंबर रोजी येणार आहेत.
पंतप्रधान मोदींची सभा -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा बारामतीत होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच भाजप कार्यकर्त्यांनी मत परिवर्तनासाठी कामाला लागावे, अशा सूचनाही बावनकुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.