...लाखो शिवसैनिक त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 09:54 PM2024-04-06T21:54:56+5:302024-04-06T21:57:15+5:30
बारामतीत शिवसेना मेळाव्यात शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला.
बारामती - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रावर कधीही नव्हते एवढे मोठे संकट आले. मात्र ठाकरे यांनी अठरा अठरा तास काम करुन महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढले. यावेळी काही लोकांनी संघटना तोडफोड करण्याची भूमिका घेतली. त्यांना माहिती नाही, पक्ष फुटला असेल,काही लोक गेले असतील. मात्र, लाखो शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकार्यांचा शिवसेना मेळावा शनिवारी (दि ६) सायंकाळी बारामतीत पार पडला. यावेळी पवार बोलत हाेते. यावेळी पवार पुढे म्हणाले, आज देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे.त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे.या निवडणुकीच्या माध्यमातून चुकीच्या प्रवृत्तीला सत्तेपासून दूर करण्याची गरज आहे. अनेक वेळा दिल्लीत चर्चा होते. शिवसेना राष्ट्रहिताचा विचार करते. शिवसेनेने कधीही दिल्लीसमोर स्वाभिमान कधीही झुकविला नाही. त्यामुळे हा संघर्ष लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. देशाच्या एक्याला सुरुंग लावला जात आहे, हे सहन केले जाणार नाही.
राष्ट्राच्या प्रश्नावर शिवसेना कधीही तडजोड करीत नाही. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष वेगळ्या पद्धतीने जावू पाहत आहेत.दहशत निर्माण करण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्यांनी कितीही दमदाटी केली तरी त्यांच्या दमदाटीला भिक घातली जाणार नाही.बारामतीकडे देशाचे लक्ष आहे. दिल्लीत बारामतीची चर्चा होते,असे देखील यावेळी पवार म्हणाले.यावेळी पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतच्या मैत्रीला उजाळा दिला.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आजची लढाइ हि दडपशाही,दिल्लीच्या महाराष्ट्रावर होणार्या अत्याचाराविरोधातील स्वाभिमानाची लढाइ असल्याचे सुळे म्हणाल्या.यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहीर यांनी हि निवडणुक हुकुमशाही विरोधात लोकशाही टीकविण्यासाठीची निवडणुक असल्याची टीका केली. यावेळी युगेंद्र पवार, राजेंद्र काळे,अविनाश बलकवडे,शरदचंद्र सुर्यवंशी,सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सुभाष ढोले आदी उपस्थित होते.
शिवसेना नेते सचिन अहिर भाषणात म्हणाले, पुरंधरला नवीन वाघ तयार झाला आहे असे वाटत होते. पण तो वाघ खोक्याच्या मागे गेला की बोक्याच्या मागे गेला माहिती नाही,असा टोला अहिर यांनी विजय शिवतारे यांचे नाव न घेता लगावला.