बारामती एमआयडीसीचा प्रश्नकायमस्वरूपी मार्गी लागणार
By Admin | Published: April 26, 2016 01:38 AM2016-04-26T01:38:31+5:302016-04-26T01:38:31+5:30
येथील एमआयडीसी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यासाठी ७ मे पर्यंत नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात येईल
बारामती : येथील एमआयडीसी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यासाठी ७ मे पर्यंत नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यातून पाणीप्रश्न सुरळीत होईल. पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असे आश्वासन एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता व्ही. के. साबळे यांनी दिले.
बारामती येथे एमआयडीसी विश्रामगृहात बारामती चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी, उद्योजकांसमवेत आयोजित बैठकीत साबळे बोलत होते. या वेळी साबळे म्हणाले, की येथील पाण्याचा
प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल. नवीन जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर एमआयडीसीला प्रतिदिन ८ ते १० दशलक्ष लिटर पाणी मिळेल. जलवाहिन्या फोडून पाणी चोरणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार देण्यात येइल. येथील रहिवाशांनादेखील पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी ‘व्हॉल्व्ह’ बसविण्यात येतील. पाणीचोरीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या. या वेळी चेंबरचे अध्यक्ष प्रमोद काकडे म्हणाले, की पाणी दोन तास पुरेशा दाबाने सोडावे. कमी दाबाने पाण्याची समस्या विशेषत: चढाच्या भागात असते. चढावर असलेल्या भागांना पाणी येत नाही. एमआयडीसी परिसरातील झाडे पाण्याअभावी जळण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्याची सोय करावी. या वेळी चेंबरचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार, बापू बाबरे, राजाभाऊ साळुंके, नरेश तुपे, कृष्णा ताटे, चंद्रकांत नलवडे यांच्यासह एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ऐ. के. आगवणे, उपअभियंता विजय पेटकर, कनिष्ठ अभियंता विलास राणे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)