Baramati: बारामती नगरपालिकेने इतिहासातील पहिला ‘टीडीआर’ केला प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 03:21 PM2023-09-12T15:21:36+5:302023-09-12T15:22:51+5:30
बारामती नगरपालिकेने आपल्या इतिहासातील पहिला टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) अधिकृतरीत्या प्रदान केला आहे..
बारामती :बारामती शहरात इतिहासातील आगळ्यावेगळ्या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील विविध कामांसाठी बारामती नगर परिषदेने काही जागा आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी शहरातील तिघांनी त्यांच्या मालकीची जागा बारामती नगरपरिषदेस हस्तांतरीत केली आहे. त्याबदल्यात त्यांना हा ‘टीडीआर’ देण्यात आला आहे. बारामती नगरपालिकेने आपल्या इतिहासातील पहिला टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) अधिकृतरीत्या प्रदान केला आहे.
बारामती नगरपरिषद वाढीव हद्दीतील विविध कामांसाठी नगर परिषदेने केलेल्या आरक्षित जागांपैकी बारामती हद्दीतील गट नंबर २४९ येथील मनोज पोतेकर, किशोर जोशी, निशांत मेहता यांनी त्यांच्या मालकीची जागा बारामती नगरपरिषदेस हस्तांतरीत केली आहे. या जागेच्या मोबदल्यात बारामती नगर परिषदेने चार हजार चौरस मीटरचे बारामतीतील पहिले टीडीआर सर्टिफिकेट सोमवारी (दि. ११) जागा मालकांना नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते प्रदान केले. यावेळी नगररचनाकार रमेश अवताडे, सहायक नगररचनाकार ऋषिकेश साळी, लिपीक अमोल गोफणे, शंतनू बारवकर उपस्थित होते. यासाठी बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, स्थापत्य विशारद जयंत किकले यांनी सहकार्य केले.
याबाबत बारामती मुख्याधिकारी महेश राेकडे यांनी सांगितले की, बारामती नगरपालिकेच्या विकासकामांसाठी आरक्षण दिलेल्या जागांबाबतच टीडीआर देणे शक्य आहे. यापुढील काळात जेथे विविध विकासकामांसाठी जागा आरक्षित केल्या जातील, तेथील टीडीआर तातडीने देण्याची व्यवस्था करणार असल्याचे मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले.