बारामतीत कोरोनाबाधितांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:12+5:302021-06-05T04:09:12+5:30
शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये आढळले ३५ कोरोनाबाधित बारामती : बारामती शहर आणि तालुक्यात शुक्रवारी (दि ४) ...
शहरात केवळ १४, तर ग्रामीणमध्ये आढळले ३५ कोरोनाबाधित
बारामती : बारामती शहर आणि तालुक्यात शुक्रवारी (दि ४) प्रथमच कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत आली आहे. गेल्या २४ तासात तपासलेल्या ४९८ नमुन्यांपैकी ४९ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील १४ आणि ग्रामीण मधील ३५ रुग्णांचा समावेश आहे. दुसऱ्या लाटेत शुक्रवारी (ता. ४) प्रथमच कोरोनाबाधितांची आकडेवारी दहापेक्षा खाली आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार आता बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वेगाने वाढले आहे. आजपर्यंत २४५४९ रुग्ण बाधित झाले असून २३०२८ रुग्ण बरे झाले आहेत. ६२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ज्या नागरिकांचे दुसरा डोस (कोव्हिशील्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे, अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. आजपर्यंत एकूण रुग्णसंख्या २४ हजार ५१९ वर गेली आहे. तर एकूण बरे झालेले रुग्ण २३ हजार २८ आहेत. आज एकूण ९६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण २१ आढळले आहेत. पैकी बारामती तालुक्यातील १४ इतर तालुक्यातील ७, त्यापैकी उपचार घेणारे एकूण ७ रुग्ण असल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर आता संबंधिताचे अहवाल येईपर्यंत विलगीकरण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या तपासणीनंतर रिपोर्ट येईपर्यंत किमान २४ तासांचा कालावधी सध्या लागतो. स्वॅब तपासणीनंतर संबंधित व्यक्ती रिपोर्ट येईपर्यंत अनेकांच्या संपर्कात येते आणि त्याच्यापासून अनेकांना संसर्ग होतो. या पार्श्वभुमीवर आता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
बारामती शहर गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. रुग्णसंख्या घटण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. मात्र, इतर व्यवसायांना देखील कोविड नियमांच्या आणि वेळेच्या बंधनासह परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे. पुणे शहरात सध्या सर्व दुकाने २ वाजेपर्यंत सुरु आहेत. तसेच सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. त्यामुळे कपड्यासह इतर खरेदीसाठी बारामतीकर पुण्याला खरेदीसाठी जाण्याची शक्यता आहे. त्यातून कोविड संसर्ग वाढण्याची भीती आहे.