बारामतीतील अधिकारी ठेकेदारीमुळे सुस्त
By admin | Published: December 1, 2014 11:31 PM2014-12-01T23:31:03+5:302014-12-01T23:31:03+5:30
बारामती नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यामुळे दैनंदिन कामासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार घेतले जात आहेत.
बारामती : बारामती नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यामुळे दैनंदिन कामासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार घेतले जात आहेत. या कंत्राटदारांचे आणि अधिकाऱ्यांचेच मिलीभगत झाल्यामुळे नगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीला चुना लागत आहे. अधिकाऱ्यांचा मनमानीपणा वाढीस लागला आहे. मुख्य काम सोडून ज्या खात्यांमध्ये कंत्राटी कामगार घेतले आहेत, त्या कंत्राटदारांच्या पाठीमागे कोण आहे, की खात्याअंतर्गत दुसऱ्याच्या नावावर अधिकारीच कामे घेत आहेत, याची चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी केली जात आहे.
बारामती नगरपालिकेच्या कारभाराने जनता हैराण आहे. वाढीव हद्दीच्या कामासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आला. रस्ते, भूमिगत गटार योजना आदी कामांसाठी नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे झाली. ज्या भागात रस्त्यांची गरज होती. त्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच ठिकाणी रस्ते झाले आहेत. हद्दवाढ झाली तरी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. रूई, जळोची, तांदूळवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी नगरपालिकेत वर्ग केले.
तरीदेखील सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग, उद्यान विभाग आदी खात्यांच्या कामांसाठी कंत्राटी कामगार घेण्यात आले आहे. त्याच बरोबर शहरातील महापुरूषांची पुतळे, स्मशानभूमी, दशक्रिया घाट, उद्याने आदींची देखभाल, स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगार लावण्यात आले आहेत. या कामांसाठी एकाच्या ठेकेदाराला अनेक कामे मिळत आहेत. त्यासाठी संस्था वेगवेगळ्या दाखविण्यात आल्या आहेत. मात्र, काम करून घेणारा ठेकेदार एकच आहे, असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष किशोर मासाळ यांनी केला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वाभाडे भर सर्वसाधारण सभेत काढले.
आरोग्य विभागातील कार्यालयात परस्पर नेमणूक केलेला कामगार काम करीत असल्याचा पोलखोल त्यांनी केला. त्याला उत्तेजन कोणी दिले. काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई केली जाणार, याची मात्र कोणी विचारणा केली
नाही. त्यामुळे आरोग्य विभागातील या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पाठविण्यात आले आहे, माहिती
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष
किशोर मासाळ यांनी दिली.
(प्रतिनिधी)