बारामती पंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:17+5:302021-09-05T04:14:17+5:30
महा आवास अभियानांतर्गत गुणवडी क्लस्टर व करंजेपूल बहुमजली इमारतीस प्रथम क्रमांक बारामती: बारामती पंचायत समितीला महा आवास अभियानांतर्गत ...
महा आवास अभियानांतर्गत गुणवडी क्लस्टर व करंजेपूल बहुमजली इमारतीस प्रथम क्रमांक
बारामती: बारामती पंचायत समितीला महा आवास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ३) पुणे येथील कार्यक्रमात गुणवडी क्लस्टर व करंजेपूल येथील बहुमजली इमारतीस प्रथम क्रमांक, तर कन्हेरी डेमोला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत महाआवास अभियान सुरू आहे. या अंतर्गत बारामती पंचायत समितीने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गुणवडी क्लस्टरमध्ये विस्तार अधिकारी संजीवकुमार मारकड, शाखा अभियंता प्रशांत मिसाळ यांना सन्मानित करण्यात आले. तालुकास्तरीय कन्हेरी डेमोला द्वितीय क्रमांक मिळाला पुरस्कार गटविकास अधिकारी अनिल बागल, सरपंच भारती शेलार, उपसरपंच मोहिते, ग्रामसेवक पूनम गायकवाड व पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तर, करंजेपूल येथील आवास योजनामधील बहुमजली इमारतीस सरपंच गायकवाड व ग्रामसेवक आबा यादव यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
करंजेपूल येथील बहुमजली इमारतीस प्रथम क्रमांक
बारामती तालुक्यातील करंजेपूल या ग्रामपंचायतीमध्ये सुरेश सखाराम गायकवाड व संभाजी सुरेश गायकवाड या दोन लाभार्थींचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन २०२०-२१ मध्ये घरकुल मंजूर आहे. संबधित लाभार्थ्यांनी कमी जागा असल्यामुळे त्यांनी कमी जागेत दोन मजली इमारतीचे बांधकाम चांगल्या पद्धतीने केलेले आहे. संबधित गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांनी योग्य नियोजन करून कामास सुरुवात केली. तसेच कामे विहित मुदतीत काम पूर्ण केले आहे.
-----------------
क्लस्टर यशोगाथा पंचायत समिती गण - गुणवडी..
बारामती तालुक्यातील गुणवडी या पंचायत समिती गणात ५ गावांचा समावेश आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत एकूण ११९ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ९६ घरकुलांचे (८१ टक्के ) बांधकाम पूर्ण झालेले आहे. घरकुल लाभार्थी अतिशय गरीब व अशिक्षित असल्याने व घरकुल बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पुरेसे पैसे त्यांचेकडे नव्हते व घरकुल बांधकाम हे शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी गुणवडी क्लस्टरचे शाखा अभियंता पी. एन. मिसाळ व संबंधित गावांचे ग्रामसेवक यांनी योग्य नियोजन केले. कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात आली.
------------------------------
कन्हेरी येथील आदर्श डेमो हाऊस
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एक कमी जागेत चांगल्या पद्धतीचे घरकुल तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना व लाभार्थीना पाहता यावे यासाठी तालुकास्तरावर डेमो हाउसची उभारणी ग्रामपंचायत कन्हेरी या ठिकाणी केलेली आहे. गटविकास अधिकारी याच्या मार्गदर्शनाने, तसेच विस्तार अधिकारी, शाखा अभियंता यांच्या समन्वयाने गावचे सरपंच व ग्रामसेवक यांनी लक्ष देऊन विहित मुदतीत बांधकाम पूर्ण केले आहे. या डेमो हाउसला गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे गावामध्ये ५ नवीन प्रशिक्षित गवंडी तयार झालेले आहेत. या डेमो हाउसमध्ये शौचालय, किचन, विद्युत जोडणी व नळ जोडणी, रेन वाॅटर हार्वेस्टिंग, परसबाग व सोलर पॅनलची सुविधा देण्यात आलेली आहे.
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना बारामती पंचायत समितीचा अधिकारीवर्ग.
०४०९२०२१-बारामती-०१
कन्हेरी येथे कमी जागेत उभा करण्यात आलेले डेमो हाऊस. या डेमो हाऊसला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
०४०९२०२१-बारामती-०२