बारामती- पाटस रस्त्याची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:13+5:302020-12-17T04:37:13+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष, ठेकेदार बेफिकीर, प्रवाशांचे हाल बारामती-पाटस रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी ? उंडवडी कडेपठार : बारामती-पाटस हायवे रस्त्याची अशरक्ष: ...
प्रशासनाचे दुर्लक्ष,
ठेकेदार बेफिकीर,
प्रवाशांचे हाल
बारामती-पाटस रस्त्याच्या
कामाला मुहूर्त कधी ?
उंडवडी कडेपठार : बारामती-पाटस हायवे रस्त्याची अशरक्ष: चाळण झाली आहे.या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असून देखील कामाकडे दुलर्क्ष केले आहे.बारामती-पाटस हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली आहे.
या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मालिका सातत्याने सुरू असते. सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या व संभाव्य अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिकांनी केला आहे. पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तसेच कुरकुंभ सारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतीसाठी हा प्रमुख रस्ता आहे. दरम्यान, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून या रस्त्यावरून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे झाले आहे.रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.तसेच साइडपट्ट्या खचल्या आहेत. यामुळे अनेक छोटेमोठे अपघात होत आहेत.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होऊन वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड पडत असून या मार्गावर प्रवास करणा-या नागरिकांना मानसिक,शारिरिक आणि आर्थिक तसेच होणा-या अपघाती संकटांना सामोरे जावे लागत आहे.यात सगळ्यात जास्त ञास आणि पडझड दुचाकीस्वाराची होते. या रस्त्यावरून अनेक दुचाकीस्वार पडलेले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य चुकीची व डोळेझाकपणाची झळ आर्थिकदृष्ट्या गोरगरीब कामगार, मजूर यांना बसत आहे. यापुढे असे छोटे-मोठे अपघात झाले तर सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बांधकाम विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण सुरू न केल्यास नागरिकांनी आंदोलनाचा दिला आहे.
--
कोट
आजपासून या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात येणार आहे. गुंजखिळा ते बारामती या रस्त्यासाठी ६ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे.
- व्ही. एम. ओव्हाळ
उपविभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारामती
-------------------
फोटो ओळ : बारामती-पाटस रस्त्याची झालेली दुरावस्था.
१६१२२०२०-बारामती-१७
----------------------------