बारामतीत मोक्का कारवाईतील आरोपींना जीवनावश्यक वस्तू पुरवणारा अखेर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 01:10 PM2021-06-08T13:10:15+5:302021-06-08T13:13:04+5:30
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बारामती: मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या बाळा दराडे टोळीला फरार कालावधीत दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवत मदत करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. राजेंद्र उर्फ एक्का महादेव चौधरी (वय २०, रा. वंजारवाडी, ता. बारामती) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळा दराडे टोळीवर पोलिसांनी यापूर्वीच मोक्काची कारवाई केली आहे. या टोळीतील फरार शुभम ओमप्रकाश खराडे याला गत आठवड्यातच स्थानिक गुन्हे शाखेने बारामती एमआयडीसी परिसरातून अटक केली होती. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत गावच्या हद्दीत बाळा पोपट दराडे, विजय बाळू गोफणे, शुभम ओमप्रकाश खराडे व अन्य दोन अनोळखी आरोपींवर भिगवण पोलिस ठाण्यात जीवे मारण्याच्या प्रयत्नांसह शस्त्र अधिनियम व दरोड्याचा गुन्हा दाखल होते.
या प्रकरणातील दराडे व गोफणे यांना बारामती तालुका पोलिसांनी नाशिकच्या पंचवटीमधून अटक केली होती. तपासामध्ये आरोपींविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली होती. चौधरी हा आरोपींना मदत करत होता. तो वंजारवाडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलीसांनी त्याला वेषांतर करीत सापळा रचून पकडले. दरम्यान आरोपीला पुढील कारवाईसाठी भिगवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.