बारामती पोलिसांनी मोठी कारवाई, मध्यरात्री भरपावसात ३१२ किलो गांजासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 01:05 AM2020-09-22T01:05:02+5:302020-09-22T01:06:14+5:30
चित्रपटाला शोभेल असा थरार! पाठलाग करुन अडवला टेम्पो
बारामती:बारामती ग्रामीण पोलिसांनी भर पावसात सोमवारी(दि.२१) मध्यरात्री ३ वाजता पोलिसांनी कारवाई करीत ३१२ किलो गांजासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आंध्रप्रदेशातुन आणलेला गांजा या मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी नाकाबंदी केली होती.मात्र,इशारा करुन देखील टेम्पो निघुन गेला.यावेळी पोलिसांनी सरकारी वाहनासह खासगी कारमधुन टेम्पोचा चित्रपटात शोभेल असा पाठलाग करुन टेम्पो अडवला.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना याबाबत माहिती मिळाली होती.त्यानुसार पाटस आणि भिगवण मार्गावर दोन पोलीस पथकाद्वारे वाहनांची कसुन तपासणी सुरु करण्यात आली. याचवेळी मध्यरात्री ३ च्या सुमारास उंडवडी येथे पाटसवरुन बारामतीच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला (एमएच.१०. सीआर. ४३२६) पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला.मात्र, त्यानंतर देखील चालकाने टेम्पो न थांबवता वेगात नेण्याचा प्रयत्न केला.पोलीसांनी त्याचा पाठलाग करीत त्याला अडवले. पोलिसांनी हा टेम्पो थांबवून झडती घेतली असता त्यात ११ पोती आढळून आली. ही पोती खोलून पाहिली असता त्यात खाकी रंगाच्या प्लास्टिक बॅगांमध्ये हा गांजा भरण्यात आला होता. पोलिसांनी सुमारे ४६ लाख रुपयांच्या ३१२ किलो गांजासह १० लाख रुपयांचा टेम्पो असा ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विजय जालिंदर कणसे (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली) , विशाल मनोहर राठोड (वय १९ रा. नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली),निलेश तानाजी चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) व योगेश शिवाजी भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत हवालदार भानुदास बंडगर यांनी फिर्याद दाखल केली. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे,योगेश लंगुटे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे,पोलीस हवालदार अनिल ओमासे, भानुदास बंडगर, दत्तात्रय सोननीस, पोलीस नाईक अनिल खेडकर, परीमल मानेर,रणजित मुळीक,संतोष मखरे,राजेंद्र काळे,प्रशांत राऊत, अमोल नरुटे,दत्तात्रय मदने,नंदु जाधव,विनोद लोखंडे, भुले्श्वर मरळे,पोपट कवितके,मंगेश कांबळे,योगेश चितारे,चालक अबरार शेख यांनी ही कारवाई केली.
—————