बारामती पोलिसांचा इंदापूरच्या तोतया पत्रकाराला दणका; चार लाखांच्या फसवणुक प्रकरणी अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 05:33 PM2021-08-17T17:33:44+5:302021-08-17T17:34:34+5:30

ऑनलाईन चारचाकी खरेदी प्रकरण; साथीदार महिला फरार

Baramati police was arrested to fake journalist of Indapur | बारामती पोलिसांचा इंदापूरच्या तोतया पत्रकाराला दणका; चार लाखांच्या फसवणुक प्रकरणी अटक 

बारामती पोलिसांचा इंदापूरच्या तोतया पत्रकाराला दणका; चार लाखांच्या फसवणुक प्रकरणी अटक 

googlenewsNext

बारामती : इंदापूर येथील तोतया पत्रकारालाबारामतीपोलिसांनी दणका दिला आहे. ऑनलाईन चारचाकी खरेदी प्रकरणी उमरज (ता. कºहाड) येथील व्यक्तीची चार लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी या तोतया पत्रकारालापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याची साथीदार महिला फरार झाली आहे.

अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मच्छिंद्र कदम (वय ३१, मूळ रा. काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, सध्या रा. देसाईवस्ती, बेलवाडी, ता. इंदापूर) असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याच्यासोबत प्रियांका पांडूरंग जाधव (रा. एमआयडीसी, बारामती) हिच्यावरही फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ती सध्या फरार आहे. याबाबत मंगळवारी (दि. १७) बारामती शहर पोलिस ठाण्यात  पत्रकार परिषद पार पडली. यावेळी  उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यावेळी उपस्थित होते.

याप्रकरणी वैभव सदाशिव लाटे (रा. भवानीपेठ, उमरज, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. ५ ऑगस्ट रोजी फिर्यादीने ओएलएक्स अ‍ॅपवर जुनी कार खरेदीसाठी जाहिरात पाहिली. त्यानुसार एक मोटार त्यांना पसंत पडली. दिलेल्या क्रमांकावर त्यांनी संपर्क केला असता महेश कदम हे त्यांच्याशी बोलले. कदम याने स्वत: पत्रकार-संपादक असल्याचे सांगितले. तुम्ही बारामतीत प्रत्यक्ष येवून मोटार पहा असे त्याने सांगितले. त्यानुसार दि. १३  ऑगस्ट रोजी फिर्यादी हे भाऊ डॉ. विक्रांत, मित्र राजकुमार जाधव यांच्यासह बारामतीत आले. यावेळी कदम यांनी बारामती बसस्थानकासमोर त्यांची भेट घेत मोटार दाखवली. मोटारीतून शहरातून फेरफटका मारला. मोटारीची कागदपत्रे पाहिली असता ती प्रियंका पांडूरंग जाधव (रा. वरलेगाव, ता. दक्षिण सोलापूर) या नावे दिसून आले. ती माझी पत्नी असून तिच्या लग्नापूर्वीच्या नावावर मोटार असल्याचे त्याने सांगितले. पाच लाख रुपयांत मोटारीचा व्यवहार ठरला. त्यातील चार लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर एक लाख रुपये मोटारीची एनओसी ताब्यात मिळाल्यावर देण्याचे ठरले. त्यानुसार भिगवण रस्त्यावरील स्टेट बँकेतील शाखेतून जाधव यांच्या खात्यात फिर्यादीने चार लाख रुपये पाठवले. नोटरी करण्यासाठी ते एका ठिकाणी थांबले असताना कदम हा घरी जावून पत्नीला घेवून येतो असे सांगून गेला. तो परत आलाच नाही. त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधल्यावरही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर  पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत तातडीने हालचाल केली. महेश कदम याला अटक केली.

पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, उपनिरीक्षक गणेश निंबाळकर, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, बापू बनकर, दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, सुनील कोळी, चैतन्य पाटील यांनी ही कामगिरी केली. कदम याच्याकडे चार लाख रुपयांबाबत विचारणा केली असता बँकेतून त्याने ही रक्कम काढल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या गुन्ह्यानंतर लागलीच दुसºया दिवशी त्याने स्विफ्ट मोटार विकणे असल्याची जाहिरात ओएलएक्सवर केली होती.
----------------------------

नागरिकांनी ऑनलाईन खरेदी-विक्री करताना काळजी घ्यावी. महेश कदम या तोतया पत्रकाराने प्रियांका जाधव या महिलेच्या साह्याने बारामती परिसरात अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता आहे. या प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा.
- मिलींद मोहिते
 अप्पर पोलिस अधिक्षक, बारामती

Web Title: Baramati police was arrested to fake journalist of Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.