बारामतीकर तापाने फणफणले!
By Admin | Published: July 26, 2016 05:22 AM2016-07-26T05:22:53+5:302016-07-26T05:22:53+5:30
वातावरणातील बदलामुळे बारामती शहर, तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच गर्दी दिसते. रुई ग्रामीण
बारामती : वातावरणातील बदलामुळे बारामती शहर, तालुक्यात विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच गर्दी दिसते. रुई ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेले चार रुग्ण डेंगीसदृश आढळून आले होते. मात्र, तपासणीनंतर विषाणूजन्य ताप असल्याचे निदर्शनास आले. ‘फ्लू’च्या तापाने त्रस्त असलेल्या रुग्णांना तातडीने टॅमी फ्लूच्या गोळ्या सुरू केल्या जातात, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिमझिम पावसामुळे खाचखळग्यात, अडगळीच्या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढते. मात्र, नगरपालिका, आरोग्य विभाग, मलेरिया खात्याच्या वतीने जनजागृती केली जात असल्यामुळे डेंगीच्या डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत झाली आहे. मलेरिया विभागाच्या वतीने शहर, तालुक्यातील टायर दुरुस्ती दुकान, नारळ विक्रीसह अन्य दुकानदारांना पाण्याचा साठा वाढू नये, यासाठी नोटिसा दिल्या आहेत. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होते.
त्यामुळे या उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर गप्पी मासे साठलेल्या पाण्यात सोडण्यात येत आहेत. परंतु, मागील आठ ते दहा दिवसांत विषाणूजन्य तापाने रुग्णांची संख्या वाढत आहे. बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात साधारणत: दररोज १०० ते १५० रुग्णांची वाढ झाली आहे. बाह्यरुग्ण तपासणीसाठी दररोज ५०० ते ५५० रुग्ण येतात. बहुतेक रुग्ण थंडी तापाने त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)
डेंगीसदृश रुग्णांवर तातडीने उपचार...
रुई ग्रामीण रुग्णालयात डेंगीसदृश ४ रुग्ण आढळून आले होते. त्यांचे पुढील तपासणीसाठी पुण्याला नमुने पाठविण्यात आले. मात्र, विषाणूजन्य ताप असल्याचे निष्पन्न झाले. हे चार रुग्ण कटफळ, तांदूळवाडी, जळोची या भागातील होते. त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार झाल्यानंतर ठणठणीत झाले आहेत.
४ रुग्णांना फ्ल्यूचा त्रास होता. आता फ्ल्यूने त्रस्त असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्ल्यूचा आजार बळावू नये, यासाठी टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या ४८ तासांच्या आत सुरू केल्या जातात.
रुग्णालयात २५० ते ३०० बाह्यरुग्णांची तपासणी होते. सध्या २० ते २५ रुग्ण विषाणूजन्य तापाने त्रस्त आहेत. शासकीय औषधांचा साठा मुबलक असल्यामुळे उपचारात अडचण येत नाहीत, असे या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दराडे यांनी सांगितले.
शहरात धूरफवारणी
सरकारी दवाखाने, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांबरोबरच शहरातील खासगी रुग्णालयात तापाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या विषाणूजन्य आजारांवर प्रतिबंध आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेळीच उपाययोजना केल्या जात आहेत. बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ६ यंत्रांद्वारे धूरफवारणी सुरू केली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गाजरगवताचे निर्मूलनदेखील केले जात आहे. जंतूनाशक पावडरचा वापर अडगळीच्या ठिकाणी केला आहे. त्यामुळे डासांची संख्या आटोक्यात आणणे शक्य झाले आहे.
मलेरियाच्या रुग्णांवर उपचार सुरू...
मलेरिया विभागाच्या वतीने शहर, तालुक्यात विषाणूजन्य आजाराबरोबरच मलेरिया अथवा इतर गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांची शासकीय तसेच खासगी हॉस्पिटलमधून माहिती घेतली जात आहे. बारामतीच्या खासगी रुग्णालयात गुणवडी आणि ढेकळवाडी या गावातील दोन रुग्णांना ‘मलेरिया’चा त्रास होत आहे. ते रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बारामती शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये इंदापूर, निमगाव केतकीसह अन्य परिसरातील रुग्ण उपचार घेत असल्याचे या विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात आज जवळपास ५२५ बाह्यरुग्णांनी उपचार घेतले. दैनंदिन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ३०० ते ३२५ असते. विषाणूजन्य तापाच्या आजारामुळे रुग्णांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.