Baramati: प्रवाशांना जादा दराने लुटणाऱ्या खाजगी वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:16 PM2021-11-17T18:16:30+5:302021-11-17T18:19:34+5:30
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने एसटी आगारातून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करण्याची उपप्रादेशिक परीवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, काही खाजगी वाहन चालक शासनाच्या निर्धारीत दरापेक्षा प्रवाशांची अडवणूक करून दुप्पट पैसे घेत होते...
बारामती: एसटी कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर जादा दराने खासगी वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांवर बुधवारी(दि १७) सकाळी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ‘लोकमत’ ने जादा दराने सुरु असलेल्या प्रवाशांच्या तक्रारीबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत उपप्रादेशिक परीवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने एसटी आगारातून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी वाहनांना प्रवाशी वाहतूक करण्याची उपप्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, काही खाजगी वाहन चालक शासनाच्या निर्धारीत दरापेक्षा प्रवाशांची अडवणूक करून दुप्पट पैसे घेत होते. पुण्यासह भिगवण, इंदापूर, फलटण, नातेपुते, मोरगाव, जेजुरी आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून जादा दराने पैसे आकारले जात होते. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द केले होते.
यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी या जादा दराने प्रवाशी वाहतुक करणाऱ्या व्यावसायिकांची गंभीर दखल घेतली आहे. तातडीने पाटील यांनी त्यांच्या पथकासह खाजगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
उपप्रादेशिक परीवहन अधिकारी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, एसटीच्या दरानुसार प्रवाशी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याला जाण्यासाठी १५५ रुपए तिकीट आहे. मात्र, या प्रवासासाठी दुप्पट म्हणजे ३०० रुपये आकारणे चुकीचे आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेला दर फलक बारामती बसस्थानकावर लावण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रवाशी दर आकारणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे पाटील म्हणाले.