कुरकुंभचे पाणी बारामती-पुरंदरला मिळणार : पाटबंधारेचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 07:00 AM2019-05-30T07:00:00+5:302019-05-30T07:00:07+5:30
राज्य सरकारने तब्बल २६ वर्षांपूर्वीच हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नव्हती.
- विशाल शिर्के
पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला या पुढे उजनी धरणातून पाणी घ्यावे लागणार आहे. राज्य सरकारने तब्बल २६ वर्षांपूर्वीच हा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नव्हती. शेतकऱ्यांनी ही बाब पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिल्यावर खडकवासला अभियंत्यांना त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पाटबंधारे मंडळाने दिले आहेत. त्यामुळे कुरकुंभचेपाणी बारामती-पुरंदरला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपुऱ्या पावसामुळे बारामती, शिरुर आणि पुरंदर या भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. जनाई-शिरसाई योजने अंतर्गत बारामती परिसराला योग्य पाणी मिळावे अशी याचिका बारामतीमधील शेतकरी विठ्ठल जराड आणि इतर पाच शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. त्याच्या सुनावणीत विवरण अधिकाऱ्यांनी जनाई-शिरसाई योजनेला सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा संपूर्ण लेखाजोखा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, जनाई शिरसाई योजनेतून बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी ३.६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला उजनी धरणातून पाणी देण्याचे आदेश राज्यसरकारने ९ सप्टेंबर १९९३ रोजी दिले होते. मात्र, अजूनही त्यांना, खडकवासला धरणाच्या काल्यव्यातूनच पाणी दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी पाटबंधारे मंडळाच्या लक्षात आणून दिले. तसेच, हे पाणी बंद करुन ठरल्याप्रमाणे आम्हाला पाणी द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
जनाई शिरसाई योजनेच्या लाभधारकांनी त्याबाबतचा शासकीय निर्णय २७ मे रोजी लक्षात आणून दिला. त्याची तातडीने दखल घेत पाटबंधारे मंडळाने या निर्णयाच्या अमंलबजावणीचे आदेश दिले आहेत. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला खडकवासला कालवा प्रणालीतून पाणी दिले जाते. जनाई-शिरसाईच्या अवर्षणग्रस्त भागाला पाणी उपलब्ध होण्यासाठी यानंतरची कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची गरज उजनी जलाशयातून भागविण्यात यावी. संबंधित संस्थेस एक महिन्याची नोटीस देऊन ही बाब लक्षात आणून द्यावी. त्यानंतर संबंधित संस्थेचा पाणी वापर उजनी धरणातून करण्याचे निर्देश द्यावेत असे आदेश पुणे पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता नं. व्यं. कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. २८) दिले आहेत.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून ३३.७७ टीएमसी प्रकल्पीय साठा आहे. जनाई योजने अंतर्गत तीन टप्प्यात बारामती आणि पुरंदरला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. तर, शिरसाई योजनेचा एक टप्पा बारामती व दौंड तालुक्यातील सिंचनासाठी मंजूर करण्यात आला आहे.