आरक्षणासाठी बारामतीत रामोशी समाजाचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:18 AM2018-08-24T03:18:18+5:302018-08-24T03:18:42+5:30
रामोशी समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी रामोशी समाजाच्या वतीने शहरातील प्रशासकीय भवन येथे मोर्चा काढण्यात आला
बारामती : रामोशी समाजाचा एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी रामोशी समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. २३) शहरातील प्रशासकीय भवन येथे मोर्चा काढण्यात आला.
दुपारी कारभारी सर्कल, गुणवडी चौक, बस स्टँड, रिंगरोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला. या वेळी जय मल्हार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांनी सांगितले की, बेरड नायका बेरड समाज हा इतर राज्यांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये आहे. त्यामुळे इतर राज्यात रामोशी समाज बांधवांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळत आहे. मात्र, महाराष्ट्रात आमच्यावर अन्याय होत आहे. मात्र, आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही.
या वेळी तहसीलदार हनुमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते. निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
मागील अनेक वर्षांपासून समाजातील विविध संघटनांनी आंदोलने केली, मोर्चे काढले. तसेच शासनाच्या विविध पातळीवर निवेदने दिली. महाराष्ट्रस्तरावर रामोशी समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. हा समाज सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागास असून, शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आले होते. आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत निर्णय झाला नाही.
या वेळी जय मल्हार क्रांती सेनेचे ज्येष्ठ नेते बबनराव खोमणे, मोहन मदने, संजय जाधव, शारदा खोमणे, सुनील चव्हाण,अंकुश जाधव, सुनील धिवार आदींची भाषणे झाली. संभाजी चव्हाण, नवनाथ मदने, आबा जाधव, मनोज पाटोळे, नाना जाधव, आबासो जाधव, सोमनाथ जाधव, सोमनाथ मदने, सागर खोमणे, गणेश जाधव, दादा चव्हाण, मालोजी जाधव, किरण खोमणे, अनिल मसुगडे, अमोल चव्हाण आदींनी मोर्चा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती संजय भोसले,
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, भरत खैरे, सनी पाटील यांनी मोर्चाला भेट दिली.
...अन्यथा तीव्र आंदोलन
रामोशी समाज शांततेने आरक्षणाची मागणी करीत आहे. २५ तारखेपर्यंत आमची मागणी मान्य व्हावी, अशी अपेक्षा आहे. अन्यथा जिल्ह्यात समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने यांनी दिला.