बारामती: चोरीला गेलेल्या सुमारे ३ लाख रुपये किंमतीच्या दुचाकी परत मिळविण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 03:09 PM2023-08-11T15:09:47+5:302023-08-11T15:14:22+5:30
पोलिसांनी वेषांतर करुन शिताफीने ही कारवाई केली...
बारामती (पुणे) : बारामती शहर आणि तालुका परीसरातून चोरीला गेलेल्या सुमारे ३ लाख रुपये किंमतीच्या दुचाकी परत मिळविण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वेषांतर करुन शिताफीने ही कारवाई केली.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी तालुका परिसर, फलटण, वडगाव निंबाळकर येथे चोरी झालेल्या ३ लाख रुपये किंमतीच्या एकूण आठ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी तपास पथकास सदर चोरट्यांना लवकरात लवकर शोधून काढण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत.
त्यावरून तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गोपनीय माहितीद्वारे चोरट्यांची माहिती काढली. त्यामध्ये हे चोरटे दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील आरोपी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने, वेशांतर करून, आरोपींचा मोटरसायकलवर पाटलाग करून पैगंबर उर्फ अजर तय्यब मुलानी (वय २३ ,रा. सूर्यनगरी, बारामती, मूळ रा नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) गणेश हनुमंत बोराटे (वय २३, रा. अवसरी, ता. इंदापूर) यांना निमगाव केतकी (तालुका इंदापूर) येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी बारामती एमआयडीसी, वडगाव निंबाळकर, फलटण येथून मोटरसायकल चोरल्याची माहिती दिली. यामध्ये दुचाकी चोरण्यासाठी आरोपी बोराटे हा मुलाणी याला मदत करीत होता. तसेच चोरीमध्ये आरोपी तय्यब मुलानी याचे चोरी करण्यात सराईत असणाऱ्या दोन मित्रांचा समावेश आहे. त्यांचा शोध तपास पथक घेत आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस हवालसदार राम कानगुडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी, संतोष मखरे यांनी केली आहे.