बारामतीच्या साखरेने हवामान तज्ज्ञांचे तोंड गोड! शरद पवारांनी पाळला शब्द, अंदाज अचूक ठरल्याने वाटली साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:45 AM2017-08-24T00:45:51+5:302017-08-24T00:46:41+5:30
हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपला शब्द पाळत, माळेगाव साखर कारखान्यातील ५० किलो साखरेची गोणी हवामान विभागातील अधिका-यांना बुधवारी दिली.
पुणे : हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्यास तज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, असे उपरोधिक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपला शब्द पाळत, माळेगाव साखर कारखान्यातील ५० किलो साखरेची गोणी हवामान विभागातील अधिका-यांना बुधवारी दिली. तसेच, काही अधिकाºयांचे तोंडदेखील गोड करण्यात आले.
बारामती येथे झालेल्या एका कार्यक्रमात खा. पवार यांनी हवामान विभागाच्या अंदाजावर उपरोधिक टीका केली होती. मात्र, त्यानंतर लगेचच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गेल्या आठवड्यात सर्वदूर पाऊस होऊन बळीराजा सुखावला. त्यामुळे पवार यांनी आपल्या वक्तव्याची आठवण ठेवत, कार्यकर्त्यांकरवी माळेगाव साखर कारखान्यातील ‘बारामतीची साखर’ अशी अक्षरे कोरलेली ५० किलो साखरेची गोणी पुण्यातील हवामान विभागात पाठवून दिली.
पुणे वेधशाळेतील वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ पी. के. नंदनकर, डॉ. ए. के. श्रीवास्तव यांना कार्यकर्त्यांनी साखर खाऊ घातली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेता चेतन तुपे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, दिलीप बराटे, रवींद्र माळवदकर, या वेळी उपस्थित होत्या. काकडे म्हणाले, हवामान खात्याचा अवमान करण्याचा पवार यांचा हेतू नव्हता. उलट यापूर्वी कृषी विभागाचे मंत्री असताना त्यांनी या खात्याला मदतच केली आहे. खात्याच्या कामगिरीचे कौतुक केले.