बारामती तालुका पोलीस ठाण्याला मिळाले नवीन वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:21+5:302021-09-03T04:10:21+5:30
सांगवी : बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी देण्यात आलेल्या नवीन स्काॅर्पिओ वाहनाचे पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करून वाहन ...
सांगवी : बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी देण्यात आलेल्या नवीन स्काॅर्पिओ वाहनाचे पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करून वाहन पोलीस ठाण्याला हस्तांतरण करण्यात आले.
बारामती पोलीस ठाण्याच्या अधिपत्याखाली एकूण २६ ते २७ गावे येतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी बारामती शहरातील भिगवण रोड, इंदापूर रोड, फलटण रोड, नीरा रोड, पाटस रोडने पोलीस ठाण्याच्या अधिपत्याखालील गावांत गस्त घालावी लागते. यामुळे गेली दहा वर्षांपासून बारामती तालुका पोलीस ठाण्याला स्काॅर्पिओ वाहन मिळावे यासाठी अनेक वेळा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर बारामती तालुका पोलिसांचे हे स्वप्न सत्यात उतरून अखेर बारामतीमधील ५ ते ६ कंपन्यानी एकत्र येत पुढाकार घेतला आणि शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून स्काॅर्पिओ वाहन भेट देण्यात आली.
बारामती तालुका गुन्हे शोधपथकाने गेली दोन वर्षांत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेलची हवा खायला लावली होती. सध्या गुन्हे उघडकीस आणणे, कायदा सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी तसेच घरफोडी, दरोडे, चोरीचे प्रकार रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणे यासाठी बारामतीच्या चारी बाजूने जाण्यासाठी ही गाडी अत्यावश्यक होती. यामुळे आता पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करताना तसेच तालुक्यात दिवस-रात्री गस्त घालण्यासाठी सोयीस्कर होणार असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
वाहनपूजनावेळी बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे उपस्थित होते.
०२ सांगवी
हस्तांतरणानंतर वाहनासमवेत पोलीस अधिकारी.