अखेर भाजप प्रदेशाध्यक्षांचा बारामती दौरा निश्चित; लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 07:54 PM2022-08-29T19:54:34+5:302022-08-29T19:55:02+5:30
प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन बावनकुळे यांचा जिल्ह्यात पहिला दौरा थेट पवारांच्या कर्मभुमीत बारामतीत आयोजित करण्यात आला आहे
बारामती : भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची आतापासूनच तयारी सुरु केली आहे. या बारामती लोकसभा मतदार संघात नियोजित भाजप ‘बारामती लोकसभा मतदारसंघ’ मिशनला अखेर मुहुर्त मिळाला आहे. ६ सप्टेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऑगस्ट मधील लांबलेला बारामती दौरा निश्चित झाला आहे. याबाबत भाजप लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.
प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन बावनकुळे यांचा जिल्ह्यात पहिला दौरा थेट पवारांच्या कर्मभुमीत बारामतीत आयोजित करण्यात आला आहे. यावरुन भाजप ने बारामती ला दिलेले राजकीय महत्व अधोरेखित होते. ६ सप्टेंबर रोजी आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपची दिशा यावेळी निश्चित होणार असल्याचे संकेत आहेत. तसेच कार्यक्रमात भाजपच्या काही शाखांची उदघाटन कार्यक्रम नियोजित आहेत. त्यासाठी बावनकुळे ५ सप्टेंबर रोजी आदल्या दिवशी बारामतीत मुक्कामी येत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासुनच रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे १३ तास त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांचे वेळापत्रक आहे. शहरासह तालुक्यातील काटेवाडी, माळेगांव येथे ते भेट देतील. त्यांच्या दौऱ्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, बाळासाहेब गावडे आदी पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे मोटे यांनी सांगितले.
बारामती लोकसभा मतदारसंघात खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ऑगस्टमध्ये तीन दिवस मुक्कामी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.मात्र,हा रद्द झालेला दौरा सप्टेंबर महिन्यातच होण्याची शक्यता आहे.बावनकुळे यांच्या दौºयात केंद्रीय मंत्र्यांच्या दौºयाच्या तयारीबाबत चर्चा होईल,असे देखील मोटे यांनी सांगितले.