Pune Rain: बारामती, वडगावशेरीला सर्वाधिक पाऊस; आजही पावसाचा इशारा
By श्रीकिशन काळे | Published: April 18, 2024 05:08 PM2024-04-18T17:08:24+5:302024-04-18T17:10:58+5:30
आज देखील सायंकाळी पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे....
पुणे : दोन दिवसांपासून उष्णतेमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी पुण्यात सायंकाळी वरूणराजाची हजेरी लागत आहे. बुधवारी (दि.१७) पुणे शहर व जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. बारामतीला गेल्या २४ तासांमध्ये २१ मिमी, तर वडगावशेरीला १७.५ मिमी पावसाची नोंद झाली. आज देखील सायंकाळी पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती असल्याने गुजरातकडून महाराष्ट्रावर आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहेत. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर पुण्यात कमाल तापमान आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. दिवसा प्रचंड उकाडा जाणवत असल्याने सायंकाळी ढगांची निर्मिती होत आणि कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. बुधवारी सायंकाळनंतर शहरात वडगावशेरी परिसरात आणि बारामतीमध्ये जोरदार पाऊस झाला. गुरूवारी (दि.१८) देखील पुण्यात सायंकाळी पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे.
दरम्यान, हडपसर, वडगावशेरी, मगरपट्टा या भागात किमान तापमान २७-२८ अंशावर नोंदवले गेले. तर शिवाजीनगरला २४.१ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे रात्री देखील उकाडा प्रचंड जाणवत आहे. आज गुरूवारी (दि.१८) पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, जळगाव, बीड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दुपारी उष्णतेची लाट असल्याने रात्री उकाडा जाणवेल, असा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून (दि.१९) तापमानात घट होईल, असा अंदाजही ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यात २४ तासांतील पाऊस
बारामती : २१.०
वडगावशेरी : १७.५
शिवाजीनगर : ४.२
कोरेगाव पार्क : ३.०
मगरपट्टा : ३.०
पाषाण : २.९
लवळे : १.५