Baramati | पालखी मार्गात येणारी इमारत उचलून चक्क ९ फुट मागे घेण्याचा प्रयोग; पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 05:35 PM2023-03-20T17:35:28+5:302023-03-20T17:40:28+5:30
ही इमारत ‘जशी च्या तशी’ पाठीमागे घेण्यात येत आहे...
काटेवाडी (बारामती) : काटेवाडी गावात संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये काटेवाडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील मासाळवाडी परिसरातील मुलाणी कुटुंबियांनी वडीलांची आठवण जपण्यासाठी चक्क दोन मजली इमारत उचलुन ९ फुट मागे सरकविण्याचा प्रयोग सुरु केला आहे.
ही इमारत ‘जशी च्या तशी’ पाठीमागे घेण्यात येत आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मुलाणी कुटुंबियांनी प्रतिकूल परस्थितीत पुर्वी आशियाना कॉम्प्लेक्स ही दुमजली वास्तु उभी केली होती. पालखी मार्गात येणारी ही दुमजली इमारत पाडण्यासाठी या कुटुंबाचे धाडस झाले नाही. कारण चार वर्षांपूर्वी अकबर मुलांणी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे या इमारतीत वास्तव्य होते. त्यांची आठवण या इमारतीत आहे. ती आठवण जतन करण्याची जिद्द मनापासून या कुंटूबाने बांधली. त्यामूळे पालखी महामार्गाला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सोशल मिडीयावर उभी इमारत आहे तशी पाठीमागे घेता येते, हे त्यांना समजले. त्यांनतर त्याचा पध्दतीने इमारत मागे घेण्याचा निर्णय घेतला.
हरियाणातील कंपनीकडे काम-
या भागात हा पहिला प्रयोग असल्याने त्याची उत्सुकता अधिक आहे. काटेवाडीतील अकबर दादासाहेब मुलानी व हसन मुलाणी या भावंडांनी त्यांची तीन हजार फूट दुमजली इमारत चक्क ९ फूट मागे सरकविण्याचे काम सुरु केले आहे. त्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे घेतली जाणार आहे. यासाठी हरियाणा येथील मोहन लाल हाऊसिग लिप्टींग स्पिंटीग कन्ट्रक्शन कंपनी नूरबाला, पानिपत (हरियाणा ) प्रशिक्षित ठेकेदार काम करीत आहेत.
बारामतीत पालखी मार्गात येणारी इमारत उचलून चक्क ९ फुट मागे घेण्याचा प्रयोग#Punepic.twitter.com/2pvbEEOD7G
— Lokmat (@lokmat) March 20, 2023
सोशल मीडियावरील व्हिडिओवरून सुचली कल्पना-
मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यातील एक हजारांहून अधिक इमारती मागे घेतल्याचा दावा केला आहे. आता काटेवाडीतील मासाळवाडी परिसरातील हा प्रयोग सुरू आहे. यावेळी ‘लोकमत’ शी बोलताना अकबर मुलाणी यांनी सांगितले की, रस्त्यात इमारत ५ फुट जात होती. निम्म्याहून जास्त इमारत सुस्थितीत शिल्लक राहणे शक्य होते. आमची पाठीमागे स्व:तची जागा शिल्लक होती. तसेच ही इमारत पाडायला देखील मोठा खर्च येत होता. नव्याने इमारत उभी करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च येणार होता. सोशल मीडियावर हरियाणातील या पध्दतीचे काम करणाऱ्यांबाबत माहिती मिळाली. त्यांनी या सर्व इमारतीचा मागे घेण्याचा दहा लाख रुपयाहून जास्त खर्च सांगितला. इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊनच त्याचा पुर्नवापर करता येणे शक्य आहे. त्यासाठी हा पर्याय निवडला आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर काम सुरु आहे.